राजगुरूनगरमधील अतिक्रमणे हटवली

राजगुरूनगर-येथील पुणे-नाशिक महार्मागावरील भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पुन्हा अतिक्रमण झाल्याने ते महसूल व पोलीस प्रशासने गुरुवारी (दि. 12) पाडून टाकले.
महसूलविभाग, राजगुरुनगर नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम, पुणे नाशिक महामार्ग प्राधिकरण आणि खेड पोलीस यांच्या माध्यमातून दि. 26 व 27 ऑक्‍टोबर 2017 रोजी अतिक्रमणे काढण्यात आली होती. यानंतर शहरातील सुनिता उघडे या महिलेने आंबेडकर पुतळा परिसरातील जागेवर पुन्हा अतिक्रमण केले होते. हे वादग्रस्त अतिक्रमण काढण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी येथील अतिक्रमण हटविण्याचे आदेश नगरपरिषद व पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार नगर परिषद व खेड पोलिसांनी दि. 10 नोव्हेंबर 2017 रोजी अतिक्रमणे हटविले होते. यावेळी अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना सुनिता उघडे यांनी शिवीगाळ करीत दगडफेक केली होती. यावेळी सुनिता उघडे व तिच्या मुलासह सात ते आठ जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमविणे, शिवीगाळ करणे, दगडफेक करणे, मुंबई पोलीस कायदा कलम 37 (1)(3) कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. मागील आठवड्यात त्यांनी पुन्हा येथे विटा सिमेंटमध्ये बांधकाम करण्यास सुरुवात करून अतिक्रमण केले. यानंतर हामार्गावर असलेल्या पुतळ्याजवळील मोकळ्या जागेत सुनिता उघडे यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने हे अतिक्रमण बेकायदा असून ते तत्काळ हटविण्यासाठी खेड तालुका भीमशक्ती संघटनेचे विजय डोळस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर, चंद्रकांत हंडोरे, जिल्हाधिकारी व पुणे ग्रामीण अधिक्षक पुणे, प्रांताधिकारी, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे व सबंधित विभागाकडे पाठपुरावा केला होता. याबरोबरच तालुक्‍यातील तालुक्‍यातील दलित संघटना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती यांनी स्थानिक पातळीवर पाठपुरावा केला होता. नुकतीच पुणे येथे पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी शांतता कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत येथील अतिक्रमण न हटविल्यास भीमाकोरेगावाची पुनरावृत्ती होण्याचे संकेत भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष विजय डोळस यांनी पोलीस अधीक्षकांना शांतता कमिटीच्या बैठकीत दिले होते.
गुरुवारी नायब तहसीलदार राजेश कानसकर, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी हजर राहून येथील अतिक्रमण जमीनदोस्त केले. यावेळी चाकण, राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर होते. ही कारवाई दोन दिवस झाली नसती तर आंबेडकरी जनतेतून 14 एप्रिल बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी तीव्र आंदोलन झाले असते. भीमा कोरेगावच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर येथे अनुचित प्रकार घडून नये म्हणून प्रशासने तत्काळ ही कारवाई केली आहे.
दरम्यान अतिक्रमण कारवाई सुरु असताना अतिक्रमण करणाऱ्या सुनिता उघडे यांनी येथे येवून अतिक्रमण कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर अन्याय केला जात आहे. कोर्टाचा आदेश दाखवा असे म्हणत निवासी नायब तहसीलदार राजेश कानसकर यांच्या सोबत वाद घातला. कानसकर यांनी त्यांना समजून सांगितले. मात्र त्या ऐकत नसल्याने महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात करताच उघडे यांना किंचित चक्कर आली. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना चक्कर येताच खासगी गाडीत बसून दवाखान्यात पाठवून दिले. येथील अतिक्रमण पुन्हा जमीनदोस्त केल्याने नागरिकांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जागा ही डोळस कुटुंबियांची पूर्वीची स्मशानभूमीची जागा आहे. येथे आंबेडकर पुतळा बसविल्यानंतर ही जागा पडीक होती. या जागेशी सबंधित व्यक्तीचा काहीएक संबंध नाही. मात्र वारंवार तेथे ती अतिक्रमण करीत आहे. ही जागा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भविष्यात होणाऱ्या स्मारकासाठी राखून ठेवण्यात आली आहे. या जागेचा उपयोग फक्त स्मारकासाठी केला जाणार आहे. येथे होणारी अतिक्रमणे कधीही खपवून घेतली जाणार नाहीत.
    -विजय डोळस, अध्यक्ष भीमशक्ती संघटना

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)