राजगुरूनगरचा पाणी प्रश्‍न अखेर मार्गी

  • 15 कोटी 48 लाखांच्या योजनेला शासनाची मंजूरी : 6 कोटी 96 लाख नगरपरिषदेच्या खात्यात वर्ग
  • नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांची पत्रकारपरिषदेत माहिती

राजगुरुनगर, दि. 31 (प्रतिनिधी) – शहराला चास कमान धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या 40 गाव पाणी योजेनेला शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत या योजनेसाठी 15 कोटी 48 लाख रुपये निधीला नगरविकास विभागाने मान्यता दिली असून निधीची 50 टक्के रक्कम रुपये 6 कोटी 96 लाख 15 रुपये नगरपरिषदेच्या खात्यात वर्ग झाल्याने राजगुरुनगर नगरपरिषदेचा गेली अनेक वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.
राजगुरुनगर शहराला चास कमान धरणातून पाणी पुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडूस (चाळीस गाव पाणीयोजना) मंजूर झाल्याचे नगरविकास विभागाने गुरुवारी (दि. 29) शासन आदेशकाढून प्रसिद्ध केल्या, त्यानुसार शुक्रवारी (दि. 30) राजगुरुनगर नगरपरिषदेत नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, गटनेते शरद बुट्टेपाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब थिगळे, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, नगरसेवक संपदा सांडभोर, संदीप सांडभोर, मनोहर सांडभोर, रेखा क्षोत्रीय, राहुल आढारी, शंकर राक्षे, सुरेश कौदरे, रफिक मोमीन, सारिका घुमटकर, अर्चना घुमटकर, नंदा जाधव, निलोफर मोमीन, संगीता गायकवाड, स्नेहल राक्षे, शहराध्यक्ष विष्णू बोऱ्हाडे, प्रदीप कासवा, मंगेश गुंडाळ यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत राज्यातील 13 नगरपरिषदांसाठी 393 कोटी रुपयांचा निधी पिण्याच्या पाण्याच्या योजना करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे, त्याचा पहिला हप्ता 168 कोटी 35 लाख रुपये थेट नगरपरिषदेच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय नुकताच देण्यात आला. यामध्ये चास कमान धरणातून पाणी योजनेला निधी मंजूर करण्यात आला आहे. गेली सात वर्षांपासून राजगुरुनगर शहराचा पाणी प्रश्‍न सुटण्यासाठी 40 गाव पाणी पुरवठा योजनेला निधी मिळण्यासाठी तेव्हाची ग्रामपंचायत व आताची नगरपरिषद यांचा पाठपुरवा सुरु होता. मात्र यामध्ये राजकारण आल्याने शहराच्या पाणी प्रश्‍नाला खीळ बसला होता. मात्र, शासनाने गुरुवारी शासन निर्णयात राजगुरुनगर शहरासाठी चास कमान धरणातून करण्यात येणाऱ्या 40 गाव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिल्याने शहरातील नागरिकांचा पिण्यासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप म्हणाले की, 2049 वर्षापर्यंत या योजनेचे पाणी नियोजन केले आहे. या योजनेत कडूस व प्रादेशिक योजेनेतील समाविष्ट कामांची उपांगे या योजनेत आहेत. त्यात चास कमान धरणातील जकवेल दुरुस्ती, चासकमान धरण अशुद्ध पाण्याची ऊर्ध्वनलिका दुरुस्ती, पंपिंग मशनरी दुरुस्ती, वेताळे येथील जलशुद्धीकरण केंद्र दुरुस्ती शुद्ध पाण्याची पाण्याची गुरुत्व वाहिनी (13.4किमी) दुरुस्ती,ही जुन्या योजनेतील कामे केली जाणार असून नव्याने शुद्ध पाण्याची गुरुत्व वाहिनी (12.16 किमी), मार्केट यार्डयेथील पाण्याची टाकी(10.60 लाख लिटर क्षमता), टेल्को कॉलनी येथील पाण्याचीत टाकी (5.10 लाख लिटर क्षमता), व वाडा रोड येथील प्राइडसिटी जवळ पाण्याची टाकी (5.5 लाख लिटर क्षमता) नव्याने बांधण्यात येणार आहेत. शहरात नव्याने जलवाहिनी वितरिका (46.2 किमी) टाकण्यात येणार आहे. त्यासाठी स्वयंचलित यंत्रणा राबविण्यात येणार आहे. प्रीपेड पद्धतीने पाणी वाटप केले जाणार असून पाणी गळती पाणी चोरी आदि बाबींवर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत या योजेनाला 15 कोटी 48 लाख रुपये मंजूर झाले असून पहिल्या हप्त्यात 6 कोटी 96 लाख 15 हजार रुपये नगरपरिषदेच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याने या योजनेचे टेंडर महिनाभरात काढण्यात येणार असून 90 दिवसांच्या आत हे काम सुरु केले जाणार असून त्यापुढे 18 महिन्याच्या आत ते पूर्ण करण्यात येणार आहे. नागरिकांना स्वच्छ मुबलक पाणी देण्याचा प्रयत्न नगरपरिषदेचा राहणार आहे. चास कमान धरणातून राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 5.3 एमएलटी, 1. 90 दलघमी पाणी आरक्षणाला मंजुरी मिळाली आहे.
– शिवाजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर नगरपरिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)