राजगुरुनगरातील पुलास हुतात्मा राजगुरू यांचे नाव?

राजगुरुनगर- शहराला जोडणाऱ्या केदारेश्‍वर जवळील भीमा नदीवरील पुलास हुतात्मा राजगुरू नाव देण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. तरी या बैठकीत काहींनी स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांचे नाव देण्याची मागणी जरी केली असली तरी हुतात्मा राजगुरू यांचेच नाव देण्याबात जनादेशाचा आग्रह असल्याने पुढील बैठकीत नाव ठरणार असल्यचे सांगून बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले.
राजगुरूनगर शहरातील वाहतूककोंडी व शहराला पर्यायी मार्ग म्हणून केदारेशवर येथे भीमा नदीवर 11 कोटी रुपये खर्च करून मोठा पूल बांधण्यात आला आहे. त्यांचे उद्‌घाटन या महिन्यात होणार असून त्याच्या नावावरून अनेक दिवसांपासून राजकारण सुरू होते. त्यामुळे सर्वानुमते नाव ठरविण्यासाठी सोमवारी (दि. 8) राजगुरूनगर येथील सावित्रीबाई फुले सभागृहात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. अनेक पक्षाच्या व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येथील पुलाला हुतात्मा राजगुरू यांचेच नाव देण्याची या बैठकीत मागणी केली. या पुलाचे नाव निश्‍चित करण्यासाठी पुन्हा बैठक बोलाविण्यात आली असून त्यात पुलाचे नाव सर्वानुमते घोषित केले जाणार आहे. येथील पुलाला हुतात्मा राजगुरुचे नाव द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काही कार्यकर्त्यांनी या बैठकीत दिला. या बैठकीला नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, भीमशक्ती तथा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, मनसेचे जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज खराबी, ऍड. वैभव कर्वे, ऍड. अनिल राक्षे, संतोष सांडभोर, उद्योजक स्वानंद खेडकर, राहुल पिंगळे, नगरसेवक शंकर राक्षे, राहुल आढारी, अश्‍विन भंडलकर, हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील वाळुंज, निलेश घुमटकर, वैभव घुमटकर, मनसेचे जिल्हा संघटक मंगेश सावंत, निलेश आंधळे, सुदाम कराळे, नितीन ताठे, कैलास दुधाळे, अमर टाटिया, प्रशांत कर्णावट, मयूर हांडे, दिलीप तापकीर, सिद्धार्थ कडलक यांच्यासह विविध पक्षाचे, संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, हा पूल बांधण्यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. केदारेश्‍वर येथे या पुलाचे काम व्हावे, यासाठी नागरिकांची मोठी मागणी होती. आता ती पूर्ण झाली आहे. पुलाचे रेंगाळले काम आणि नागरिकांची अडचण यामुळे केदारश्‍वर पूल तालुक्‍यात राजकीय टीकेचे लक्ष झाले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांच्यात अनेक सार्वजनिक कार्यक्रमात टीका टिपण्णी होत होती, आता पूल पूर्ण होताच त्याला कोणाचे नाव द्यायचे यावरून राजकारण सुरु झाले आहे. या नावाच्या वादात मध्यंतरी मनसेनेही उडी घेतली होती.
राजगुरुनगर शहरातील या पुलाला नाव काय द्यायचे यावरून मध्यंतरीच्या काळात नगरपरिषदेच्या सभांमध्ये चर्चा झाली होती. शहरातील काही ठराविक नागरिकांनी स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांचे नाव देण्याची लेखी मागणी केली होती. त्यानुसार नगरपरिषदेने स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांचे नाव देण्याचा ठराव केला होता. मात्र, सोमवारी झालेल्या बैठकीत हुतात्मा राजगुरु यांचेच नाव देण्याकडे जनाधार होता तरी अंतिम नावाची घोषणा पुढील बैठकीत घेतली जाईल, असे जाहीर करून बैठक संपविण्यात आली.

  • नगरपरिषदेच्यावतीने येथील केदारेश्‍वर पुलाला स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. या नावाला काहीनी आता विरोध केला आहे. आजही विरोध करीत आहेत. शहरातील सर्व नागरिकांना विचारात घेवून पुलाला नाव देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत सर्वांनी एकमत करून निर्णय घ्यावा.
    – शिवजी मांदळे, नगराध्यक्ष, राजगुरूनगर नगर परिषद
  • राजगुरुनगर शहरात स्व. बाळासाहेब आपटे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे शहरातील पुलाला स्वर्गीय बाळासाहेब आपटे यांचे नाव दिले पाहिजे.
    -ऍड. गणेश सांडभोर, जिल्हा समन्वयक, शिवसेना
  • केदारेश्‍वरजवळील पुलाला हुतात्मा राजगुरू, धर्मवीर संभाजी राजे, संत सावता महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पैकी एका महापुरुषांचे नाव देण्याची मनसेची अनेक दिवसांपासून मागणी होती. या पुलाला हुतात्मा राजगुरु यांचेच नाव द्यावे. अन्यथा मनसेस्टाईलने आंदोलन केले जाईल.
    समीर थिगळे, जिल्हाध्यक्ष, मनसे
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)