राजकीय वातावरण तापायला सुरूवात

दोन्ही राजेंसह भाजपचे कार्यकर्ते लागले तयारीला; शिवसेनेत शांततेचे वातावरण

सम्राट गायकवाड

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा – लोकसभा व विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असून सातारा तालुक्‍यात राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. खा.उदयनराजे व आ.शिवेंद्रसिंहराजे या दोन राजांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी तयारीला सुरूवात केली आहे तर स्वबळावर निवडणूकीचा नारा देणाऱ्या शिवसेनेकडून मात्र अद्याप कोणतीही तयारी होताना दिसून येत नाही.
मागील निवडणुकीत दोन्ही राजेंचे मनोमिलन होते. त्यामुळे सातारा तालुक्‍यात निवडणूकीत फारशी चुरस झाली नाही. मात्र, नगरपालिकेच्या निवडणूकी दरम्यान मनोमिलन तुटले आणि तेव्हा पासून दोन्ही राजेंमध्ये संघर्षाच्या घटना घडण्यास सुरूवात झाली.

तर नुकतेच साताऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खा.उदयनराजेंनी आ.शिवेंद्रसिंहराजेंचा केलेला आवर्जुन उल्लेख व त्यानंतर एका खासगी कार्यक्रमात त्यांची झालेली भेट पाहता पुन्हा एकदा मनोमिलन होणार का, असा प्रश्‍न देखील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते निवडणुकीची तयारी करताना सावधानता बाळगताना दिसून येतायत. मागील विधानसभा व नगरपालिकेच्या निवडणूकीनंतर आलेल्या अनुभवामुळे आ.शिवेंद्रसिंहराजे यांनी गाफील न राहता सातारा तालुक्‍यात आपले दौरे सुरू केले आहेत. आ.शिवेंद्रसिंहराजे गटाकडे पंचायत समिती असल्यामुळे ग्रामीण भागात तसेच शहरी भागात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे ह्या जमेच्या बाजू आहेत.

तर खा. उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीकडे पालिका असल्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे जाळे ह्या जमेच्या बाजू आहेत. अशा स्थितीत भाजप मागील निवडणूकीपासून सातारा शहरासह तालुक्‍यात शिरकाव करण्यास सुरूवात केली आहे. मागील विधानसभेच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार असलेले दिपक पवार यांना सातारा शहरातून मताधिक्‍य मिळाले होते व त्यानंतर झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सहा नगरसेवक देखील निवडून आणण्यामध्ये यश मिळाले.

तेव्हापासून भाजपने शहरासह संपुर्ण तालुक्‍यात बुथ कमिट्यांच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करण्यास सुरूवात केली आहे. सातारा तालुक्‍याचे तीन विधानसभा मतदारसंघामध्ये विभाजन झाले आहे. त्यामध्ये साताऱ्यासह कोरेगाव आणि कराड-उत्तर मतदारसंघाचा समावेश झाला आहे. भाजपकडून साताऱ्यातून दिपक पवार, कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे तर कराड उत्तरमधून मनोज घोरपडे हे निवडणूकीची जोरदार तयारी करताना दिसून येतायत. राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे सातारा तालुक्‍यातील भाजपच्या तिन्ही उमेदवारांना पक्ष पाठबळ देत आहे. परिणामी सातारा तालुक्‍यात भाजपच्या रूपाने तिसरा पर्याय तयार होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर दोन्ही राजेंचे पुन्हा मनोमिलन होणार की काय, अशा देखील चर्चां सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दोन्ही राजे गटाचे कार्यकर्ते सावध पावले टाकत असले तरी दुसऱ्या बाजूला भाजपने तिन्ही उमेदवारांच्या निमित्ताने सातारा तालुक्‍याचा गड काबिज करण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. तर दुसरा भाग म्हणजे, दोन्ही राजेंमधील संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपकडून लोकसभेसाठी खा. उदयनराजेंना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

त्याचाच भाग म्हणून सातारा दौऱ्यावर दोन वेळा आलेले मुख्यमंत्र्यांनी खा.उदयनराजेंचे आणि खा.उदयनराजेंनी सरकारच्या कामगिरीचे केलेले कौतुक हा देखील चर्चेचा विषय होताना दिसून येत आहे. तर स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेकडून मात्र अद्याप निवडणूकीच्या दृष्टीने कोणतीही तयारी होताना दिसून येत नाही. त्यामागे तालुक्‍यात न वाढलेले संघटन हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या केंद्रस्थानी दोन्ही राजे व भाजप हेच असणार की ऐनवेळी शिवसेना आपला झंझावात निर्माण करणार याकडे आता सातारा तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

तिघांच्या निमित्ताने भाजपचे राजेंसमोर आव्हान
सन. 2009 च्या निवडणुकी दरम्यान सातारा तालुक्‍याचा काही भाग कोरेगाव व कराड-उत्तर मतदारसंघाला जोडला आहे. तेव्हापासून त्या मतदारसंघातून आ.शशिकांत शिंदे व आ.बाळासाहेब पाटील हे निवडून आले मात्र, त्यानंतर देखील दोन्ही आमदारांनी देखील सातारा तालुक्‍यातील राजकारणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. परिणामी सातारा तालुक्‍यावर दोन्ही राजे गटाचा प्रभाव कायम राहिला. हे एका बाजूला चित्र असले तरी दुसऱ्या बाजूला मात्र सातारा तालुक्‍यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपकडून दिपक पवार, महेश शिंदे व मनोज घोरपडे यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी निवडणूकीच्या निकालानंतरच सातारा तालुक्‍यावर दोन्ही राजे गटाचे वर्चस्व अबाधित राहणार की भाजप साताऱ्याचा गड ताब्यात घेणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)