राजकीय फटाके फुटणार!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचा कर्जत येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी भाजपने निगडी-प्राधिकरणात कार्यकर्ता मेळावा तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने रहाटणी येथे कामगारांची परिषद घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची रणनिती आखली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची एकाच दिवशी शहरात सभा होत असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

नववर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरुर या दोन्ही मतदार संघात शिवसेनेचे खासदार आहेत. मागील विधानसभा निवडणूक व महापालिका निवडणुकीत आलेल्या भाजप लाटेमुळे यंदाची लोकसभा निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक आहे. त्यातच युतीचे चित्र स्पष्ट नसल्याने भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीला लागले आहेत. भाजपमध्ये सत्तेत सहभागी होवूनही अलिप्तवादाचे धोरण स्विकारणाऱ्या शिवसेनेला गाफिल ठेवून महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात स्वतंत्र लढण्याची भाजपची तयारी सुरु झाली आहे. भाजपचा नुकताच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला. यामध्येही दानवे यांनी याबाबतचे स्पष्ट संकेत दिले होते. तसेच युती झाल्यास मावळ व शिरुर मतदार संघावर भाजप दावा सांगणार असल्याचेही स्पष्ट केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने मावळ व शिरुरचा गड कायम राखण्यासाठी हलचाली सुरु केल्या आहेत. खेड (राजगुरुनगर) येथे शिवसेनेने शिरुर लोकसभेअंतर्गत नुकताच शेतकरी मेळावा घेतला होता. त्यानंतर मावळ लोकसभेसाठी येत्या 1 नोव्हेंबर रोजी कर्जत येथील पोलीस मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी भाजपचा निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर मेळावा होणार आहे. यामध्ये लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील शहरात आहेत. पिंपरी-चिंचवडला कामगारनगरी म्हणून संबोधले जाते. सध्या शहरात कामगार चळवळ थंडावली असली तरी एकेकाळी हेच कामगार शहरातील राजकारणाची दिशा ठरवायचे. त्यामुळे कामगार परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रवादी निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे अध्यक्ष असलेल्या कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून रहाटणीतील थोपटे लॉन्समध्ये ही कामगार परिषद होणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शहरात एकाच दिवशी मुख्यमंत्री फडणवीस व शरद पवार यांच्या सभा होणार असल्याने भाजप व राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे. दोन्ही नेत्यांपैकी कोण गर्दी खेचणार याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)