राजकीय फटाकेबाजी (अग्रलेख)

प्रातिनिधिक छायाचित्र

वर्षातील सर्वांत मोठा आणि उत्साहाने ओसंडून वाहत जाणाऱ्या दीपावली उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधामुळे नागरिकांना फटाके वाजवण्याचा आनंद पूर्णांशाने घेता येणार नसला, तरी राज्यातील आणि देशातील राजकारण्यांच्या राजकीय फटाकेबाजीने ही कसर भरुन निघणार आहे. गेल्या काही दिवसात दीपावलीचे निमित्त साधून सर्वच पक्षातील नेते जी राजकीय फटकेबाजी करीत आहेत ती कोणत्याही आवाजाच्या फटाक्‍यापेक्षा कमी नाही असेच म्हणावे लागेल. याबाबतचा सर्वात मोठा फटाका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमात फोडला.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांनी पाठिंबा दिला, तर आम्ही मित्रपक्षांचे खासदार लोकसभेत पाठवू; अन्यथा आम्ही आमचे खासदार निवडून आणू,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष शिवसेनेला दिला. ‘कोणी काही छापले किंवा लिहिले तरी राज्यात आजही भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष आहे आणि पुढेही राहील,’ असा दावाही त्यांनी या वेळी केला. पुण्यात फडणवीस अशा प्रकारे शिवसेनेवर तोंडसुख घेत असताना तिकडे नाशिकमध्ये सरकारमधील दोन क्रमांकाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावरुन एकमेकांची पाठ थोपटण्याचे काम करीत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्थात या व्यासपीठावरुनही उद्धव ठाकरे यांनी सरकारचे कान उपटण्याचे काम नेहमीच्याच पद्धतीने केले. जनतेच्या हितासाठी कोणाबरोबरही युती करण्यास तयार असल्याची घोषणा या व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे यांची अशी भुमिका असतानाही आणि ते सतत स्वबळाची भाषा करीत असतानाही शिवसेनेबरोबर युतीसाठी भाजपकडून प्रयत्न होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील कार्यक्रमात ‘याल तर तुमच्यासह, अन्यथा तुमच्याविना’ या भाषेत केलेली फटकेबाजी महत्त्वाची आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूरमध्ये सध्या शिवसेनेचे खासदार आहेत, त्यामुळे भाजपने मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांसमेवत सभा घेणे, हा शिवसेनेला इशारा आहे असेही मानायला हरकत नाही. याच व्यासपीठावरून बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात पाठवण्याची भाषाही केली.दानवे यांची विधाने त्यांच्याच पक्षातील लोक गांभिर्याने घेत नसल्याने हे केवळ एक टाळीखाऊ वाक्‍य होते, असेही समजायला हरकत नाही.

नाशिकमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण समितीच्या अहवालाबाबत तेच विधान केले आणि कायद्याच्या पातळीवर टिकणारे आरक्षण देण्याची घोषणा केली. मराठा संघटनांनी सरकारला दिलेली मुदत संपण्यास काही दिवस बाकी असतानाही, या विषयाबाबत सरकार पातळीवर काहीच हालचाली दिसत नसल्याने मराठा संघटनांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि येत्या काही दिवसात या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांतदादा प्रत्येक व्यासपीठावर आरक्षण समितीचा अहवाल 15 नोव्हेंबरपूर्वी सादर केला जाईल, अशी घोषणा करीत आहेत. पण किमान हा विषय तरी भाजपच्या नेत्यांनी राजकीय फटाकेबाजीचा समजू नये. 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाने सरकारला मुदत दिली असल्याने, ही मुदत संपण्याची वाट पहाण्यात काहीच अर्थ नाही.

सरकारने हा विषय गांभिर्याने घेतला नाही तर मराठा आंदोलनाचे जे फटाके फुटतील त्याची धग सरकारला सहन होणार नाही. राज्यात अशी परिस्थिती असताना देशपातळीवर राफेल नावाच्या बॉंबचा आवाज वाढू लागला आहे. कॉंगेस अध्यक्ष राहुल गांधी फटाक्‍याची वात पेटवण्याचे काम करीत आहेत आणि त्याच्या आवाजाने नरेंद्र मोदी यांना कानठळ्या बसत आहेत. पण राहुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याऐवजी मोदी यांनी, विरोधी पक्ष नेते असत्याच्या फैरी झाडत असल्याचा आरोप करीत आहेत. अर्थात राफेलवरुन होत असलेल्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांचा खुलासा म्हणजे सुतळी बॉम्बसमोर लवंगी फटाक्‍याचा क्षीण आवाज ठरत आहे. या दिवाळीत आणि नंतरही राफेलवरुन दोनही बाजुंनी जोरदार फटाकेबाजी होण्याची चिन्हे दिसत आहेत. याच महिन्यात आणि पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार असल्याने तेथेही आरोप प्रत्यारोपाचे जोरदार फटाके वाजणार आहेत.

महागाई आणि इतर समस्यांनी ग्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या जखमांवर फुंकर घालणारे आश्‍वासक निर्णय हवे आहेत. महाराष्टृाचा विचार करता निम्यापेक्षा जास्त राज्य दुष्काळाने वेढले आहे. लोकांना आणि जनावरांना पाणी नाही. चारा टंचाई आहे. म्हणूनच सरकारने दुष्काळाची घोषणा केली असल्याने आता पुढील कारवाई करून लोकांना दिलासा द्यायला हवा. दुष्काळग्रस्त भागातील लोकांच्या घरातील अंधार दीपावलीत दूर करण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. राजकीय फटाकेबाजीने कोणाचेच भले होणार नाही, हे समजून घेण्याची गरज आहे. दरवर्षी दीपावलीत देशातील आणि राज्यातील लोकांना छापील शुभेच्छा देऊनही काही होणार नाही. आगामी काळ सर्वाना सुखसमृद्धीचा,आनंदाचा आणि भरभराटीचा जायचा असेल तर नुसत्या घोषणा करुन काहीच होणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)