राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकार्‍याचा दारू पिऊन धिंगाणा

सातारा बसस्थानकातील प्रकार; एसटी प्रशासनासह पोलिसांना बघून घेण्याची भाषा

सातारा – एका राजकीय पक्षाच्या माजी पदाधिकर्‍याने सातारा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात दारू पिऊन धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. मात्र याबाबत राज्य परिवहन विभागाने व पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात व केंद्रात सत्तेत असणार्‍या व जागातील शक्तीशाली पक्षाचा माजी पदाधिकारीच असा वागत, सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणार असेल तर हेच का त्या पक्षाचे पार्टी विथ डिफरन्स असा सवाल विचारला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दोन दिवसांपूर्वी सायंकाळी आठच्या सुमारास गोलमारूती मंदीर ते बोगदा परिसरात राजकीय पक्षाच्या एका माजी पदाधिकार्‍याने दारूच्या नशेत दंगा घातला. रस्त्यावरच स्वत:ची कार उभी करून पुढे कोणी जायचे नाही, असा आदेशच या महाशयांच्या मुखातून निघाला होता. त्यामुळे नसत्या उचापती कशाला म्हणून अनेक नागरिकांनी महशयांचा त्रास व दारूचा वास बराच वेळ सहन केला.

मात्र या महाशयांचा उपद्रव माहित नसलेल्या सातारा आगाराच्या सातारा ते आसनगाव जाणार्‍या बसचालकाने बाजुला असलेल्या जागेतून पुढे जाण्याचे धाडस केले. त्यानंतर या पदाधिकार्‍याचा पारा भलताच चढला, त्याने व त्याच्या एका प्याद्याने बसचालकाचा पाठलाग करून दमदाटी करण्यास सुरूवात केली. मी कोण आहे, माहित आहे का? तुला कळते का? तू कोणाला ओव्हरटेक करून आला आहेस, असे म्हणत दंगा घालण्यास सुरूवात केली. दरम्यान आजुबाजुला बघ्यांची जमलेली गर्दी बघून कधीच व्यासपीठ न मिळालेल्या या पदाधिकार्‍याने मग आपल्या काढून घेतलेल्या पदाचा व पक्षाचा भलताच रुबाब दाखवण्यास सुरूवात केली.

बिच्चारा बस चालक कसा तरी हातापाया पडून निघून गेला. पण हातचं सावज गेल्याचे या तर्ऱ तर्ऱ पदाधिकार्‍याच्या काही वेळाने लक्षात आल्याने, त्याने आपला मोर्चा बसस्थानकाकडे वळवला. त्यानंतर वाहतूक नियंत्रक, आगार व्यवस्थापक यांचे विनाकारण डोके खाण्यास सुरूवात केली.

मी कोण आहे,माझा पक्ष माहित आहे का? या त्याच त्या ठरलेल्या वाक्यांचे पारायण करण्यास सुरूवात केली. महाशयांची जीभ जरा जड आल्याने ते काय म्हणत आहेत याची कल्पना लगेच येत नसल्याने अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील संवादात अंतर पडत होते. त्यामुळे चिडलेल्या या स्वंयघोषीत नेत्याने एसटी अधिकार्‍यांना बघून घेण्याची भाषा केल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आमची सत्ता कुठेकुठे आहे. हे माहित आहे का? असे म्हणत पुन्हा जड झालेली जीभ बोलायला लागली.

बसस्थानकातून एकही बस बाहेर न जावू देण्याची भाषा सूरू झाली. त्यामुळे बराच वेळ फालतू बडबड सहन करणार्‍या पोलिसांनी जर तुम्ही बसेस आडवल्या तर आम्हाला कारवाई करावी लागेल, असा समजुतीचा दम दिला. काही काळ पोलिस संरक्षण मिळाल्याने आपण गृहमंत्रीच झालो,या आर्विभावात असलेल्या या महाशयांनी पोलिसांनाही बघून घेण्याची भाषा केली.

बसस्थानकात बराच काळ सुरू असलेल्या या प्रकाराची ना राज्यपरिवहन विभागाने तक्रार दिली, ना पोलिसांनी त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे मात्र राज्यात व केंद्रात पुन्हा सत्तेत येण्याची तयारी करणार्‍या त्या पक्षाला विचार करण्याची वेळ आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)