राजकीय नेते काही देव नाहीत आणि कायद्यापेक्षा मोठेही नाहीत

मुंबई – राजकीय नेते हे काही देव नाहीत आणि ते कायद्यापेक्षा मोठेही नाहीत. यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे, अशी उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलिसांना समज दिली. कांदळवनाची कत्तल करून तेथे कार्यालय आणि बंगले बांधणाऱ्या मीरा रोड येथील भाजपचे नगरसेवक परशुराम म्हात्रे आणि शिवसेनेच्या नगरसेविका अनिता पाटील या दोघांवर आठवडयाभरात पर्यावरणीय संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई करण्याचे आदेशही यावेळी न्यायालयाने पोलिसांना दिले.

मीरा रोड येथील रहिवाशी भरत मोकळ यांनी ऍड्‌. डी. एस. म्हैसकर यांच्यामार्फत याविरोधात जनहित याचिका केली आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. वारंवार तक्रार करूनही पोलिसांनी त्याबाबत काहीच कारवाई केली नसल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शिवाय तहसिलदारानेही जागेची पाहणी करून या नगरसेवकांनी कांदळवनाची कत्तल केल्याचा अहवाल सादर केल्याचे न्यायालयाला सांगितले. हे ऐकल्यानंतर संतापलेल्या न्यायालयाने पोलिसांना फैलावर घेतले. पोलीस एवढे हतबल आहेत की ते पालिका अधिकारी तसेच नगरसेवकांवर कारवाई करू शकत नाही, असा प्रश्‍नही उपस्थित केला. यावर पर्यावरण संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदींचा अभ्यास करण्यासाठी पोलिसांनी वेळ मागितला. त्यावरूनही न्यायालयाने पोलिसांना खडसावले. कायद्यानुसार हे आरोपी शिक्षेस पात्र आहेत. शिवाय त्यांना कठोर दंड आकारण्याचीही तरतूद असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)