राजकीय दबावामुळे होईना “त्या’ अपहाराची चौकशी

  • सरपंच अनिल नवले यांचा आरोप : कारेगाव ग्रामपंचायत 2010-15 दरम्यान झाला अपहार

रांजणगाव गणपती – कारेगाव (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या सन 2010 ते सन 2015 या कार्यकाळात झालेल्या अपहाराची चौकशी करून त्याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करुन ही काही राजकीय नेत्यांच्या दबावामुळे अद्यापपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही, असा आरोप कारेगावचे सरपंच अनिल ऊर्फ किसन नवले यांनी केला आहे.
शासन परिपत्रकानुसार शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी 30 दिवसांमध्ये कारवाई होणे अपेक्षित असताना जिल्हा परिषद प्रशासन या कारवाईत केवळ वेळकाढूपणा करत आहे. आज 60 दिवस होऊन ही केवळ एक ते दोन दिवसांत कारवाई होईल, असे आश्वासन दिले जात आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील 24 कंपन्यांनी दिलेला कर तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने शिरुर येथील कॅनरा बॅंकेच्या शाखेत भरला होता. याबाबतचा सर्व तपशील जसे कर पावती, पोहोच पावती आदी माहिती जिल्हा परिषदेने गोळा करुन ही अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली न गेल्याने अधिकारी दवाबाखाली काम करत असल्याचे नवले यांनी सांगितले. कारेगाव ग्रामपंचायतमध्ये सन 2010 ते 2015 या कालावधीत तत्कालीन सरपंच वनिता कोहोकडे आणि ग्रामसेवक विजयकुमार सोनवणे यांच्या कार्यकाळात सुमारे 1 कोटी 82 लाखांचा अपहार केला होता. याबाबत सरपंच अनिल ऊर्फ किसन नवले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, तक्रार दाखल करुन दोन महिने उलटून ही अद्याप पर्यंत कुठली ही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी जिल्हा परिषद व शिरुर पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असल्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याच्या दबावामुळे कारवाई करत नसल्याचा आरोप नवले यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)