राजकीय जिरवाजिरवीतले धक्कातंत्र!

महापौर निवडणुकीतील राजकीय उत्सुकता : शिवसेनेचा स्वतंत्र, तर राष्ट्रवादी-भाजपचा एकत्र प्रवास

प्रदीप पेंढारे

नगर  – महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज शुक्रवारी झालेल्या राजकीय घडामोडींचा वेग नगरकरांनी अनुभवला. राज्याच्या राजकीय पटलावर वेगळी वाट चोखळणारी समीकरणे नगरच्या राजकीय पटलावर घडली आहे. प्रदीर्घ मित्रपक्ष असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वाटा स्वतंत्र झाल्या आहेत, तर जातीयवाद पसरविणाऱ्यांबरोबर कधीच जाणार नाही, अशी टीका करणाऱ्या राष्ट्रवादीने भाजपला साथ दिली आहे. भष्ट्राचाराचे आरोप करत राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थिती युती करणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या भाजपने सारथी म्हणून राष्ट्रवादीला जवळ केले आहे. हे सर्व राजकीय पटलावरचे अनुभव सामान्य नगरकरांना धक्कादायकच आहे. परंतु नगरकरांना धक्‍क्‍यांची आता सवय झाली आहे. जिरवाजिरवी, एवढेच या राजकीय घडामोडींमागील कारण असल्याची चर्चा नगरमध्ये रंगली आहे. चर्चा काहीही असो, भाजपचाच महापौर व उपमहापौर झाला आहे, हे एवढं नक्की!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदी कोण, याचीच उत्सुकता गेली आठवडाभर नगरच्या राजकीय पटलावर होती. राज्यापासून ते नगरपर्यंत सर्वच बाजूने यावर राजकीय घडामोडी घडत होत्या. शिवसेना व भाजपची युती होईल, असे अपेक्षीत होते. राष्ट्रवादीने भाजपला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले. त्यामुळे राजकीय महत्त्वकांक्षा बाळगून असलेली भाजपला ही संधी चालून आली. महापौर व उपमहापौरपदी पक्षश्रेष्ठींना भाजपच दिसू लागले. तशी जबाबदारी स्थानिक नेत्यांवर सोपवली होती. कोणत्याही परिस्थितीत राजकीय समीकरण जुळवून आणा, असे सांगून महापौरपदाबाबत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी चुप्पी साधली. ही खामोशी एवढी होती की, शिवसेनेत देखील अस्वस्थता पसरली. त्यामुळे शिवसेनेची सत्तास्थापनेचे शेवटच्या क्षणी संधी हुकली.

अडीच वर्षापूर्वी भाजपने मोठेपण दाखवून शिवसेनेला महापौरपदी संधी दिली होती. त्याचबदल्यात शिवसेनेकडून भाजपने महापौरपदाची पहिली संधी मागितली होती. तसे न झाल्याने शिवसेनेच्या हातातून सत्ता समीकरणे महापौर निवडणुकीच्या पूर्वसंध्येला निसटली. त्यामुळे निवडणुकीचा उत्सुकता शिगेला पोहचली. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी स्थानिक पातळीवर एकत्र येत, भाजचे खासदार दिलीप गांधी यांना पुन्हा विश्‍वासात घेत राजकीय पटलावर वेगळीचे समीकरण जुळवली. त्यात भाजपच्या सत्ता रथाचे सारथी राष्ट्रवादी झाल्याचे आज स्पष्ट झाले.
महापौर निवडणुकीसाठी नगर-औरंगाबाद रोडवरील महापालिकेचे कार्यालय सज्ज झाले होते. प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी होती. पोलीस बंदोबस्त तगडा होता.

महामार्ग असल्याने काही काळ जड वाहतूक बंद करण्यात आली होती. घड्याळातील काटा अकरावर सरकताच, उत्सुकता वाढली. कार्यकर्ते महापालिका आवाराभोवती गोळा झाले होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनी सकाळी दहा वाजल्यापासून महापालिका आवारात तळ ठोकला होता. शिवसेनेच्या नगरसेवकांनी बसमधून उतरताच महापालिका सभागृह गाठले. शिवसेनेच्या गोटात सारिका भुतकर नव्हत्या, त्यांच्याऐवजी समाजवादी पक्षाचे असीफ सुलतान दिसले. शिवसेनेचे सुभाष लोंढे हे स्वतंत्र आले. यावरून शिवसेनेची अस्वस्थता दिसून आली. कॉंग्रेसचे पाच नगरसेवक स्वतंत्र आले. यावरून राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या आघाडीत बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी-भाजप-बसपचे नगरसेवक एकाच बसमधून आले. यावरून सत्तासमीकरणाचे चित्र स्पष्ट झाले. नगरकरांना हा धक्का अनपेक्षीत होता, पण तो ग्राह्य देखील होता. राजकीय समीकरणे कोणाच्याच बाजूने नसतात, अशी ही राष्ट्रवादी-भाजप-बसप युती सांगून गेली. या युतीचे सर्वेसर्वा भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप हे असल्याचे कोणापासूनही लपून राहिले नाही. यात सर्वात शेवटी शिवद्रोही श्रीपाद छिंदम याची एन्ट्री झाली. त्याला पोलीस संरक्षण होते. तरी देखील सभागृहात शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्याला मतदान देताच चोप दिला.

कार्यकर्त्यांकडून फटाके जप्त

महापौर व उपमहापौर कोण, याची उत्सुकता शिगेला होती. महापालिका कार्यालयाभोवती शिवसेनापेक्षा भाजपचे कार्यकर्ते अधिक होते. काहींनी मतदानापूर्वीच जल्लोष करण्यास सुरूवात केली. फटाके फोडले. शहरातील बालिकाश्रमरोडवर बाबासाहेब वाकळे यांच्या समर्थकांनी फटाके फोडले. त्यावरून पोलीस अधिकच सावध झाले. त्यांनी महापालिका परिसरातील कार्यकर्त्यांकडून पोलिसांनी फटाके जप्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)