राजकीय आकसामुळे अण्णासाहेब मगर स्टेडियमची दुरवस्था!

पिंपरी – राजकीय आकसामुळे अण्णासाहेब मगर स्टेडियमची दुरवस्था झाली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला असून लवकरात लवकर या स्टेडियममध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी एका निवेदनाने करण्यात आली आहे. महापालिकेच्या नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची अवस्था भयावह झाली आहे. हे स्टेडियम राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या प्रभागात येत असल्याने निधी देण्यात आखडता हात घेत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते कुणाल जगनाडे यांनी केला आहे.

आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्टेडियमचे नूतनीकरण करून अद्ययावत सुविधांसह ते खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे. कामगार कल्याण मंडळ व पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1975 मध्ये अण्णासाहेब मगर स्टेडियम उभारले. पाच हजार आसन क्षमतेचे मगर स्टेडियम पाच एकर जागेत बांधण्यात आले. विविध क्रीडा प्रकारांचा विचार करुन मैदान बांधले गेले. शालेय व व्यावसायिक स्पर्धा या मैदानावर झाल्या. यातून कोट्यवधीचा निधी पालिकेस प्राप्त झाला; मात्र निधीतून स्टेडियमची वेळोवेळी देखभाल न झाल्याने स्टेडियमची रया गेली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्टेडियमच्या प्रवेशव्दारातच अस्ताव्यस्त पडलेले साहित्य पहायला मिळते. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने विविध कारवायांमध्ये जप्त केलेले साहित्य या मैदानात आणून टाकले आहे. त्यामुळे हे खेळाचे स्टेडियम आहे की, भंगाराचे गोदाम, असा प्रश्‍न पडतो. स्टेडियमच्या बांधकामाची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी भिंतीना चिरा पडल्या असून भिंतीवरील प्लॅस्टर निघत आहे. त्यामुळे आतील लोखंडी गज स्पष्ट दिसून येतात. स्वच्छता गृहाची अवस्था अत्यंत भयावह आहे. सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी कठडेच धोकादायक अवस्थेत आहेत. छतावरील पत्रे तसेच प्रवेशव्दाराच्या शटरचे लोखंडी पत्रे तुटलेल्या अवस्थेत आहेत. मगर स्टेडियमची ही अवस्था क्रीडाप्रेमींसाठी संतापजनक आहे. महापालिकेने स्टेडियमचे स्ट्रक्‍चरल ऑडिट देखील केले आहे. त्यात स्टेडियमची इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्टेडियमचे नूतनीकरण करुन अद्यावत सोयी-सुविधांसह ते खेळाडूंना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कुणाल जगनाडे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)