अग्रलेख | राजकारणातील धर्माचा हस्तक्षेप

राजकारणात धर्म आणू नये असे म्हणण्याची प्रथा आहे. पण प्रत्यक्षात धर्माशिवाय राजकारण चालतच नाही असा आजचा काळ आहे. धर्मनिरपेक्षतेचा जप गेली अनेक दशके जितका अखंडपणे सुरू आहे तितकाच धर्मावरून राजकारण करण्याचा प्रघात प्रबळ होत चालला आहे. अलिकडेच दिल्लीतील आर्चबिशप अनिल काऊटो यांनी देशभरातील ख्रिश्‍चन धर्मगुरूंना एक पत्र पाठवून सन 2019 च्या निवडणूकीत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत यासाठी प्रार्थना करा असे आवाहन केले आहे. त्यांच्या पत्राचा तपशील उघड झाल्याने त्यावरून देशात नवीन वादंगाला तोंड फुटले असून भारतीय जनता पक्षाने याचे मोठे भांडवल आत्तापासूनच सुरू केले आहे. आर्चबिशप काऊटो यांचे पत्र मोदी भक्तांकडून त्यांच्या टोमणेबाज टिपण्यांसह सोशल मिडीयावर फिरू लागले आहे. भाजपने अधिकृतपणे अशा प्रकारच्या पत्राला आक्षेपही घेतला आहे.

धर्ममार्तंड किंवा राजकीय नेते जातीधर्माच्या नावाने मतदारांवर कितीही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षातील निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर मात्र सामान्य जनता जाती धर्माच्या प्रभावाबाहेर जाऊन मतदान करीत असते हे बहुतेक वेळेला सिद्ध झाले आहे. हे आपल्या प्रगल्भ भारतीय लोकशाहीचे सौंदर्य स्थळ आहे. कर्नाटकात मुस्लिम आणि दलित बहुल मतदार संघातही भाजपचा प्रभाव राहिला हे याचेच द्योतक मानावे लागेल. 

विशेष म्हणजे धर्मनिरपेक्ष भारतात हा धर्माच्या नावावरून सुरू असलेला हस्तक्षेप आहे असे भाजपचे म्हणणे आहे. आणि आर्चबिशप यांनीही हाच मुद्दा पत्रात उपस्थित करताना मोदी सरकारमुळे देशाची धर्मनिरपेक्षता धोक्‍यात आली आहे असा गळा काढला आहे. या साऱ्याच बाबी हास्यास्पद पातळीवर पोहचल्या आहेत. असे पत्र पाठवणारे आर्चबिशप आणि त्यांच्या या पत्राला आक्षेप घेणारे राजकीय नेते हे दोघेही धर्मनिरपेक्षतेच्या नावानेच ओरडत असल्याने लोकांना हसू फुटल्याशिवाय राहणार नाही. एकूणातच धर्मनिरपेक्षता हा विषय आता थट्टेच्या पातळीवर गेला आहे. मुळात आर्चबिशप पदावरच्या एखाद्या धर्माधिकाऱ्याने राजकारणाविषयी असे पत्र आपल्या धर्मप्रसारकांना पाठवणे योग्य आहे काय? हा प्रश्‍न जसा महत्वाचा आहे तसेच एखादी राजवट आपल्याला सोयीची वाटत नसेल तर त्याच्या विषयी नाराजी व्यक्त करण्यात चूक काय? हाही प्रश्‍न दुसऱ्या बाजुला उपस्थित केला जात आहे. आर्चबिशपच्या पत्राला आक्षेप घेणारा भाजपही आजवर हिंदु धर्माचेच पद्धतशीर राजकारण करत आला आहे ही वस्तुस्थिती कोणाला नाकारता येईल काय? उलट भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला आर्चबिशपच्या या पत्रामुळे आता अधिकच चेव चढणार आहे.

मतांसाठी इस्लामिक धर्मगुरूंची मनधरणी करण्याचे प्रयत्नही या आधी अनेक वेळा झाले आहेत. दिल्लीच्या जामा मशिदीच्या इमामाला प्रत्येक लोकसभा निवडणुकीवेळी कोणत्यानाकोणत्या राजकीय नेत्याने त्यांची भेट घेऊन मतांसाठी गळ घातलेली आपण पाहिली आहे. आणि त्या धर्माच्या प्रमुखांनीही आपल्या मतदारांना विशिष्ट पक्षालाच मते देण्याविषयीचे फतवेही काढले आहेत. त्यात आता ख्रिश्‍चनांच्या धर्मगुरूंची भर पडली आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर धर्म आणि जातीच्या राजकारणाला प्रभावी पायबंद कसा घालायचा यावर सर्वच पातळ्यांवर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. धर्मजातीच्या नावाने मते मागायला कायद्याने बंदी आहे, पण त्यामुळे धर्म, जातीचा राजकारणातील प्रभाव कमी झाला आहे असे दिसलेले नाही. माध्यमांमध्येही निवडणुकीचे राजकीय विश्‍लेषण करताना धर्म आणि जातीचा उल्लेख नेहमीच केला जातो. जर जात आणि धर्मावरून निवडणूक लढवण्यास बंदी आहे तर त्याच विषयावरून राजकीय विश्‍लेषण करतानाही माध्यमांवर बंदी का घालू नये यावरही आता विचार करण्याची वेळ आली आहे.

निवडणूक आयोगाकडे तसा आग्रह धरला गेला पाहिजे. आणि निवडणूक सुधारणांच्या प्रस्तावात आता या मुद्‌द्‌याचाही समावेश व्हायला हवा आहे.अलिकडेच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीतही धर्म आणि जातीचा अमर्याद वापर झाल्याचे आपण पाहिले आहे. कर्नाटकची सारी इलेक्‍शन लिंगायत समाजाच्या प्रश्‍नाभोवती फिरत राहिली. त्यांच्या मठांचे धर्मगुरू आणि त्यांच्या अनुयायांनी केलेल्या मागण्यांना या निवडणूक प्रक्रियेत खूप महत्व दिले गेले. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेतली तर दिल्लीच्या आर्चबिशप यांनी आपल्या धर्माच्या लोकांमध्येही राजकीय जागृती करण्याच्या उद्देशाने एखादे पत्र जारी केले तर त्याला कशाच्या आधारावर आक्षेप घेणार? त्यांची ही कृती धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने चुकीचीच आहे पण जर देशातील साऱ्याच जाती आणि धर्मसमुह आपआपल्या हिताचे राजकारण करण करीत असतील तर आर्चबिशपांच्या या कृतीला आक्षेप घेण्याचा नैतिक आधिकार कोणालाही उरत नाही. आर्चबिशपांच्या पत्रावर आता भाजपकडून मासलेवाईक प्रतिक्रीया सुरू झाल्या आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे की आर्चबिशप जर मोदींना विरोध करा म्हणून प्रार्थना करा असे म्हणत असतील तर आम्हीही मोदींसाठी भजने आणि कीर्तने करून त्यांचे समर्थन करू. त्यांचे हे विधान म्हणजे एखाद्याने केलेल्या वेडेपणाला आम्हीही तितक्‍याच वेडेपणाच्या कृतीने उत्तर देऊ असे सांगण्यासारखे आहे.

धर्ममार्तंड किंवा राजकीय नेते जातीधर्माच्या नावाने मतदारांवर कितीही प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी प्रत्यक्षातील निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर मात्र सामान्य जनता जाती धर्माच्या प्रभावाबाहेर जाऊन मतदान करीत असते हे बहुतेक वेळेला सिद्ध झाले आहे. हे आपल्या प्रगल्भ भारतीय लोकशाहीचे सौंदर्य स्थळ आहे. कर्नाटकात मुस्लिम आणि दलित बहुल मतदार संघातही भाजपचा प्रभाव राहिला हे याचेच द्योतक मानावे लागेल. आपल्या धर्माची एकगठ्ठा मतपेढी तयार करण्याचा प्रयत्न करणारी धर्ममार्तंड मंडळी आणि निवडणुकीत धर्माचा वापर करणारे राजकीय नेते यांना आता संघटीतपणे चलेजावचा नारा देण्याची वेळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला लेखात दिलेले स्पष्टीकरण कितीही पटण्यासारखे असले तरी त्यावरील सुचविलेला निवडणुकीत धर्माचा वापर करणाऱ्या राजकीय नेत्यांना संघटित पणे चलेजावचा नारा देण्याची वेळ आलेली आहे हा सुचविलेला उपाय एकतर्फी वाटतो कारण हा उपाय सुचविताना त्यास परिणामकारक प्रतिउपाय सुचविणे गरजेचे ठरत नाही का ? हे न केल्याने गोंधळाची जी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यतात आहे त्याचे निराकारण कशा प्रकारे करणार ? माझ्या मागील प्रतिक्रियेत मी ५०० यॊग्य उमेदवार निवडण्याची देशातील समस्त विचारी राजकीय विचारवंत समाजसेवक पत्रकार सुसंस्कृत मतदार ह्यांना उपाय सुचविला परंतु आजपर्यंत ह्याचा गांभीर्याने विचार होताना दिसत नाही हे आस्चर्य नव्हे ? प्रसार माध्यमातून अथवा भाषणांना गर्दी जमवून विचार मांडल्याने हा प्रश्न सुटेल असे समजणे हास्यस्पद ठरत नाही का ? कि १२५ कोटी ह्या देशातील लोकसंख्येत वरील मंडळींना एकहि माईचा लाल शोधून सापडत नाही असे समजावे ? तेव्हा देशातील बुद्धिवंतांमद्धे सुयोग्य विचार व उपाय सुचविणाची बुद्धीच नसेल तर राजकारणातील धर्माचा हस्तक्षेप कसा दूर होणार ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)