राजकारणातला सचिन !

एक तरुण प्रतिनिधी म्हणून आज आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद सांभाळत असताना व्यवसायाने मेडिकल क्षेत्रात असणारे सचिन हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक समाजसेवक आहेत. एक व्हिजन घेऊन ते आळंदी आनंदी करू पाहत आहेत. त्यांच्या या स्वप्नांत ज्ञानेश्‍वर माऊली त्यांच्या पाठीशी उभे आहेत.

ज्याला सतत शिकण्याचा ध्यास असतो, तो भविष्यात उन्नत होत जातो. नगरसेवक पदापर्यंत पोहोचूनही सचिन गिलबिले यांनी आपला शिकण्याचा ध्यास सोडला नाही. त्यामुळंच ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. सचिन यांचं पाचवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण चऱ्होलीतील नगरपरिषदेच्या शाळा क्रमांक तीनमध्ये झालं. दहावीला चौथा क्रमांक पटकावून बारावीतही त्यांनी उत्तम गुण मिळवले. पुढं पुण्यात येऊन डिफार्मसीचं शिक्षण घेतलं. हे शिक्षण संपल्यानंतर त्यांनी मेडिकलचा व्यवसाय आळंदीत सुरू केला. हा व्यवसाय सांभाळता सांभाळता आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. हा सारा व्याप सांभाळत असतानाही ते बी.एस.एल.एल.एल.बी. करत आहेत. शिक्षणाचा घेतलेला वसा ते अविरत जपत आहेत, म्हणूनच सचिन रामदास गिलबिले हे आजच्या तरुणांसाठी आदर्श ठरतात.

सचिन यांचे वडील रामदास सोपान गिलबिले हे मूळचे शेतकरी कुटुंबातले. समाजाभिमुख विचार करण्याचे संस्कार सचिन यांना त्यांचे वडील आणि चुलते राजेंद्र गिलबिले यांच्याकडून मिळाले. समाजकार्याची आणि लोकांमध्ये मिसळण्याची आवड असल्यामुळं सचिन यांचे वडील रामदास गिलबिले हे नगरसेवक झाले. तीन वर्षं नगरसेवक म्हणून त्यांनी कामही केले; पण त्यावेळी त्यांची आर्थिक स्थिती बेताची होती. घराची सगळी जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळं त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे एखाद्या नगरसेवकाला राजीनामा द्यावा लागल्याची आळंदीच्या इतिहासातली ही ऐतिहासिकच घटना म्हणावी लागेल. रामदास गिलबिले आजही नोकरी करतात. पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सचिन गिलबिले राजकारणात दाखल झाले. नगरसेवकपदाची निवडणूक लढवून ते सर्वात जास्त मतांनी निवडूनही आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आळंदीच्या विकासाकडे लक्ष…

तीर्थक्षेत्र म्हणून आळंदीचा नावलौकिक मोठा आहे. हा लौकिक विकासाच्या पातळीवरही अधिकाधिक उंचावर गेला पाहिजे असं स्वप्न सचिनजी पाहतात. आळंदीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असतात. पुणे-आळंदी रोड, देहू-आळंदी रोडच्या विकासकामांचा पाठपुरावा करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

शिक्षण असेल तर माणूस स्वतःची प्रगती करू शकतो यावर सचिन यांचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच सी.एस.आर फंडच्या माध्यमातून त्यांना ते ज्या शाळेतून शिकले त्या नगरपरिषदेच्या शाळेला 36 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात त्यांना यश मिळालं आहे. शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही ते मोलाचं काम करत आहेत. गेल्या पाच वर्षांत पूर्ण करण्याची विकास कामे वेगानं पूर्ण सचिन यांनी केवळ अडीच वर्षांत पूर्ण करून दाखवली आहेत. विकासकामांच्या या धडाक्‍याबाबत बोलताना सचिन म्हणाले, “”भविष्यात आळंदी शहरचा विकास खूप वेगळ्या पद्धतीने मला करायचा आहे. आळंदीतील रस्ते, वीज, पाणी, नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व समस्या सोडवायच्या आहेत. माझ्या प्रभागात स्वतंत्र पोलीस चौकी करण्याचेही नियोजन मी आखले आहे. स्मशानभूमी, जॉगिंग पार्क, बोटिंग क्‍लब, वाचनालय, अभ्यासिका या गोष्टी करण्याचा माझा मानस आहे. इतकंच नाही तर लोकवर्गणीच्या माध्यमातून अनेक विधायक उप्रकम राबवायचे आहेत.”

आळंदी ही देवाची भूमी आहे. लाखो भाविक माऊलींच्या दर्शनाला पायी येतात. माऊलींची सेवा व्हावी म्हणून गेली दोन वर्षं सचिन गिलबिले आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतात. माणसांत राहिलं तरच माणसांना समजून घेता येतं, त्यांच्याशी संवाद साधून त्यांची सेवा करता येते, त्यामुळंच सतत माणसांच्या गराड्यात राहायला त्यांना आवडतं. समाजाशी त्यांचा संपर्कही त्यांचा दांडगा आहे. राजकारण हे माणसांच्या सानिध्यात राहूनच चांगल्या प्रकारे करता येतं, याची नेमकी समज सचिन गिलबिले यांना आहे. क्रिकेटमध्ये कमीत कमी वयात मोठा पल्ला गाठणारा सचिन तेंडुलकर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच प्रमाणं राजकारणातही कमीत कमी वयात सचिन गिलबिले यांनी मोठा पल्ला गाठल्यानं राजकारणातला “सचिन’ असं बिरुद त्यांना देणं सार्थ ठरतं.


अपटुडेट लोकप्रतिनिधी 

राजकारणाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहणाऱ्यांमध्ये सचिन गिलबिले यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल. राजकारण नेमकं कशासाठी असं विचारल्यावर ते म्हणाले, “”राजकारण हे वाईट नसतं. उलट समाजकारण करण्यासाठी राजकारणाची मदत घेतली तर जास्तीतजास्त लोकांचे प्रश्‍न आपण सोडवू शकतो. लोकप्रतिनिधी म्हणून चांगलं काम करण्यासाठी मला स्वतःला खूप अपडेट राहावं लागतं. नवनवीन तंत्रज्ञान, स्मार्ट फोन, इंटरनेट अशा आजच्या काळातील अत्याधुनिक माध्यमांचा विकासासाठी कसा उपयोग करून घेता येईल, त्यावरच माझा भर असतो. कारण नगरसेवक असलो तरीही आजच्या काळात टिकायचं असेल तर काळाच्या ओघात येणाऱ्या नव्या गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे.”


पत्नीची साथ

राजकारणाची धुरा सक्षमपणे सांभाळायची असेल तर कुटुंबाची साथसोबत महत्त्वाचीच! पत्नी चैत्राली या सचिन गिलबिले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. कुटुंबाची आर्थिकघडी देखील ते अत्यंत कटाक्षाने सांभाळतात. कानिफनाथ आणि नवनाथ नावाची त्यांची दोन मेडिकल स्टोअर आळंदीत आहेत. समाजकारणाबरोबरच त्यांचा ते उरलेला वेळ व्यवसायासाठी देतात. व्यवसाय विस्ताराच्या अनुषंगानंही त्यांनी काही योजना आखल्या आहेत. मेडिकलच्या रिटेल, होलसेलच्या क्षेत्रात त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. आपल्या मेडिकलच्या माध्यमातून रुग्णांना स्वस्त औषधं कशी उपलब्ध होतील याकडेही त्यांचे लक्ष असते. सचिन गिलबिले यांना भविष्यात बांधकाम व्यवसायात देखील उतरायचे आहे, त्यासाठी त्यांनी “कानिफनाथ कन्स्ट्रक्‍शन एंटरप्राइजेस’ ही संस्था देखील सुरू केली आहे.


सोशल फाउंडेशनचीही स्थापना…

समाजासाठी काम करता यावं, यासाठी “सचिन गिलबिले सोशल फाउंडेशन’ गिलबिले यांनी सुरू केले आहे. त्याअंतर्गत ऍम्बुलन्ससेवा पुरवली जाते. तसेच आरोग्य शिबिरांचंही आयोजन केलं जातं. अनेक रुग्णांना मोफत औषधोपचारही केले जातात. आजवर हजारो रुग्णांना आम्ही सेवा पुरवली असून सध्या वैद्यकीय क्षेत्राच्या अनुषंगानं फाउंडेशन काम करत आहे, पण भविष्यात सेवेचा परीघ वाढवायचा असल्याचं सचिन गिलबिले यांनी सांगितलं. तसेच या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गरिबांची आणखी कशाप्रकारे सेवा करता येईल याचे सध्या प्लॅनिंग सुरू असून ते लवकरच पूर्णत्वास येईल, असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)