रागावर नियंत्रण

मानवी मन हे अनेक प्रकारच्या भाव-भावनांनी भरलेले असते. राग, लोभ, आनंद, प्रेम, मत्सर या विविध भावनांचे भांडार असते. मनात प्रत्येक भावनांचे कमी जास्त मिश्रण असते. प्रत्येक व्यक्तीत आणि त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव असतो. पण आपण त्या व्यक्तीला ती रागीट आहे, प्रेमळ आहे अशी लेबले लावतो. खरं तर सर्वच भावना मनात असतातच मग एखाद्याचा राग लवकर येतो. किंवा एखादा खूप भावनाप्रधान असतो असे का होते. तर त्या भावनेवर त्यांना ताबा मिळवता येत नाही.

राग येणे स्वाभाविक आहे. पण या रागावर नियंत्रण मिळविणेही अशक्‍य नाही. पूर्वी राजे लोकांच्या राजवाड्यात “क्रोधागरे’ असायची म्हणे. जर राणीला राग आला तर ती त्या क्रोधागरात जाऊन बसत असे मग अर्थातच राजा तिची मनधरणी करत असेल. राग व्यक्त करायची अशी ठराविक जागा ठरविता येते का? तर नाही पण कल्पना चांगली आहे. आपणही आपल्या तीन किंवा चार रुमच्या फ्लॅटरुपी राजवाड्यात एखादा कोपरा तरी शोधून ठेवावा आणि त्याचे नामकरण क्रोध-कोपरा करावे.

हा गमतीचा भाग सोडला तर खरोखरच “रागावणे’ हे शरीराला अपायकारकच असते. आपल्या शरीराला तर त्रास होतोच. पण ज्याच्यावर आपण रागावतो, ज्याला रागावून बोलतो त्याचेही मन आपण दुखावतोच. संगीतामध्ये जसे भूप, यमन, मालकंस, भैरवी असे रागाचे विविध प्रकार आहेत. त्या प्रत्येक रागाची सुरावट व तिचे सौंदर्य वेगळे आहे. तशी मनातल्या रागाचीदेखील विभागणी असावी. म्हणजे चूक असेल तिथे रागावायचेच नाही का? तर तसे मुळीच नाही. पण रागावण्याचा सूर जरा कमी जास्त करीत लयीत रागावायचे कसे शक्‍य आहे? पण प्रयत्नाने ते जमू शकते.

-Ads-

राग येण्याचे प्रमाण आपल्या त्या व्यक्तीच्या नात्यावरही अवलंबून असते. मुलांनी केलेल्या चुकीबद्दल रागावताना आईचा सूर जरा कमीच लागतो. पण सुनेने केलेल्या चुकीकरिता तो तीव्र असतो. पती-पत्नीच्या रागावण्याचे तर काही विचारू नका. दिवसातून कितीवेळा तरी चिडचिड चालू असते. रागावल्यावर तर कधी कधी भांड्यांचे आवाज देखील वाढतात. पण लग्नाला बरीच वर्षे झाली असतील तर तो एक रोजचा कार्यक्रमच होऊन बसतो. रागावायचे, रुसायचे आणि पुन्हा हसायचे.

लहानपणची बहीण भावंडांची भांडणे मध्यम सुराची असतात. तिने माझी एखादी वस्तू घेतली, मी इस्त्री करून ठेवलेला शर्टच नेहमी तो पळवितो किंवा बॅटबॉल किंवा पत्ते खेळताना झालेली भांडणे आणि रागवा रागवी. त्या रागापेक्षा प्रेमच जास्त असते. परंतु, कालांतराने भावंडे मोठी होतात, शिकतात, स्वतंत्र होतात, मग त्यांच्या एकमेकांमधील प्रेमाची जागा “राग’ घेतो. मग घरातील कुरबुरी, इस्टेटीच्या वाटण्या, आई-वडिलांचा सांभाळ करणे यात सर्वात एक स्पर्धा व चुरस होत राहते व यातून होणारी भांडणे तीव्र स्वरांची किंवा अगदी कोर्टापर्यंत जाणारी होतात. माणसे अशी का वागतात हेच कळत नाही.
राग हा माणसाचा शत्रू आहे. तो मनातील प्रेम भावनेला मारून विजय मिळवितो. म्हणून मनातील प्रेमाची, मायेची भावना विझू देऊ नका. रागाला त्यावर विजय मिळविता येऊ देऊ नका. योग्य वेळी रागावणे हे नेहमीच शिस्तीसाठी आवश्‍यक असते. पण त्याचाही अतिरेक नको.

मुळात “राग’ ही भावना मनामध्ये कमी प्रमाणात असू दे व तिची जागा प्रेमाने, मायेने भरून काढू यात म्हणजे बघा आपलेच आयुष्य किती सुंदर होईल!

– आरती मोने

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)