पंतप्रधान नरेंद्र मोदी : खेड्यांचे परिवर्तन झाल्यास भारतात नक्कीच परिवर्तन
मंडला – अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या राक्षसी वृत्तीच्या लोकांना फाशी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील मुलींवर होणाऱ्या बलात्कारांच्या घटना संवेदनशील आहे. अशा घटना रोखण्यासाठी मुलांनाही मुलींचा सन्मान करण्यास शिकविले पाहिजे. त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
मध्य प्रदेशातल्या मंडला येथे राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आज शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. येत्या पाच वर्षासाठी आदिवासींच्या सर्वंकष विकासाचा पथदर्शी आराखडाही पंतप्रधानांनी जारी केला. मंडला जिल्ह्यातल्या मनेरी इथे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या एलपीजी बॉटलिंग प्लॅन्टचे भूमीपूजन केले. तसेच 100 टक्के धूरविरहीत स्वयंपाक घरे, मिशन इंद्रधनुष अंतर्गत 100 टक्के लसीकरण आणि सौभाग्य योजनेअंतर्गत, 100 विद्युतीकरण साध्य केलेल्या गावांच्या सरपंचांचा पंतप्रधानांनी सत्कार केला.
देशभरातल्या पंचायत राज प्रतिनिधींना संबोधित करताना पंतप्रधानांनी महात्मा गांधींच्या ग्रामोदय ते राष्ट्रोदय आणि ग्राम स्वराज संकल्पनेचे स्मरण केले. महात्मा गांधीजीनी नेहमीच खेड्यांचे महत्व अधोरेखित केले असे सांगून खेड्यांप्रतींची आपली कटिबद्धता प्रत्येकाने दृढ करु, या असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
ग्रामीण विकासाविषयी निधी महत्वाचा असतो. मात्र गेल्या काही वर्षात यासंदर्भातल्या चर्चेत बदल घडला आहे. आता, एखाद्या प्रकल्पासाठी निर्धारित केलेला निधी, उपयोगात आणला जात आहे किंवा नाही, त्याचा उपयोग वेळेवर आणि पारदर्शी पद्धतीने केला जात आहे किंवा नाही याविषयी लोक चर्चा करतात, असे पंतप्रधान म्हणाले.
कृषी क्षेत्रातल्या स्वयंपूर्णतेसाठीचे प्रयत्न अधोरेखित करताना ते म्हणाले, पाण्याच्या थेंबाथेंबाचे जतन करायला हवे. जलसंवर्धनाबाबत काटेकोर लक्ष पुरवावे, असे आवाहन त्यांनी पंचायत प्रतिनिधींना केले.
आर्थिक समावेशकतेसाठी जनधन योजना, आदिवासी जमातींच्या सबलीकरणासाठी वनधन योजना, शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी गोबर-धन योजनेचे महत्व पंतप्रधानांनी विषद केले. खेड्यांचे परिवर्तन झाल्यास भारतात नक्कीच परिवर्तन होईल असेही त्यांनी सांगितले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा