राऊतवाडीतील महिलांचा चासकमानवर हंडा मोर्चा

शिक्रापूर- राऊतवाडी येथे नागरिकांना पाणीपुरवठा करणारे तळे अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले असून त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कित्येक दिवसांपासून चासकमान कार्यालयामध्ये पाण्याची मागणी करून देखील तळ्याला पाणी सोडले नसल्याने अखेर शुक्रवारी (दि.10) संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी चासकमान कार्यालयावर हंडा मोर्चा काढून कार्यालयासमोर भजन आंदोलन केले.
शिक्रापूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी चासकमान कालव्यासाठी संपादित झालेल्या आहेत. चासकमानच्या चारी क्रमांक 12 आणि 13 मधून राऊतवाडी, वाबळेवाडी, देवखलमळा, विरोळेवस्ती, कळमकरवस्ती येथील नागरिकांना राऊतवाडी येथील तळ्यातून पाणी पुरविले जाते. परंतु या तळ्यामध्ये चासकमानच्या कालव्यामधून पाणी सोडले जात असते. अनेक दिवसांपासून येथील तळ्याला पाणी सोडले गेले नसल्याने नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. येथील नागरिक आणि शेतकऱ्यांनी मागणी करून देखील चासकमानच्या अधिकाऱ्यांनी या तळ्याला पाणी सोडले नाही. त्यामुळे महिला आणि ग्रामस्थ संतप्त झाले आणि माजी सरपंच रामराव सासवडे, महिलांनी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष मल्हारी राऊत यांच्या नेतृत्वाखाली चासकमान कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
यावेळी माजी सरपंच रामराव सासवडे, माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, भाजपचे सरचिटणीस पंढरीनाथ गायकवाड, तंटामुक्ती उपाध्यक्ष मल्हारी राऊत, तानाही राऊत, भरत म्हेत्रे, सुनील भूमकर, पंढरीनाथ डोमाळे, अरुण राऊत, मालन राऊत, संगिता राऊत, मनिषा गायकवाड, अलका राऊत, सविता राऊत, सुजाता भूमकर यांसह आदी महिला, शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तर यावेळी महिलांनी हंडा मोर्चा काढून चासकमान कार्यालयासमोर भजन करत आंदोलन केले. आमच्या हक्काचे पाणी देत नाही तोपर्यंत आंदोलन थांबविणार नसल्याचे सांगितले. तर यावेळी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळाले नाही तर, मोठ्या प्रमाणात आंदोलन करून रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी अनेक ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यानंतर चासकमानचे शाखा अधिकारी संजय चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, चासकमान चारी क्रमांक 12 मधून राऊतवाडी येथील तळ्यामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. तसेच पुढील नियोजन करून इतर ठिकाणी पाणी सोडले जाणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)