“रांजणगाव देशमुख’साठी सतीश रणधीर बनले जलदूत

रांजणगाव देशमुख – कोपरगाव तालुक्‍यातील रांजणगाव देशमुख व परिसराला दुष्काळ तसा पाचवीलाच पूजलेला. अशा दुष्काळी परिस्थितीत येथील सतीश निवृत्ती रणधीर यांनी दुष्काळात आपले बोअरवेल गावासाठी खुले करून ते एकप्रकारे गावासाठी जलदूतच बनले आहेत.

सध्या पावसाळ्यातही अनेक ठिकाणी भयंकर दुष्काळ जाणवत आहे. कोपरगाव तालुक्‍यातील रांजणगाव देशमुख व परिसरात पावसाळा सुरू होऊनही दुष्काळाच्या झळा तीव्र जाणवत आहेत. रांजणगाव व परिसरातील सोयगाव, धोंडेवाडी, बहादरपूर, मनेगाव व वेस या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धोंडेवाडी येथील तलावाने तळ गाठला आहे. कॅनॉलला पाणी येऊनही वीजबिल थकीत असल्याने या तलावात पाणी नाही. रांजणगाव देशमुखमध्ये पिण्यासाठी, वापरण्यासाठी व जनावरांच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गावात व गावाशेजारी कुठेही पुरेसे पाणी भरण्यासाठी विहीर, हातपंप अथवा बोअरवेल उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत रांजणगाव देशमुख येथील सतीश निवृत्ती रणधीर हे पुढे सरसावले आणि त्यांनी आपले बोअरवेल मागील वर्षापासून गावासाठी खुले करून दिले आहे.

रणधीर यांच्या बोअरवेलला भरपूर व पिण्यायोग्य पाणी आहे. त्यांच्या शेतामध्ये कायम भाजीपाल्याची पिके ते घेत असतात. सध्या भाजीपाल्याला चांगला भाव असतानादेखील या काळात त्यांनी स्वतःची जमीन न फुलवता सर्व पाणी गावासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या कामामुळे रांजणगाव देशमुखच्या नागरिकांना पाणीटंचाईतून तारले आहे. रणधीर यांचे बोअरवेल गावापासून दूर असल्यामुळे त्यांनी पाणी पुरवण्यासाठी एक नवीन वाहन खरेदी केले आहे. त्या वाहनावर 1 हजार लीटर क्षमतेची टाकी बसवलेली आहे. त्यामध्ये पाणी भरून ते संपूर्ण गावामध्ये वितरित करत करतात. केवळ डिझेलसाठी नाममात्र शुल्क ते नागरिकांकडून घेतात. ज्याला जेवढे लागेल तेवढे पाणी ते देतात. एक हंडाभर पाण्यापासून ते 1 हजार लीटर क्षमतेपर्यंत पाणीपुरवठा करत असतात. गावामध्ये व गावाशेजारील इतर वाड्या-वस्त्यांवर ते पाणीपुरवठा करत आहेत. नागरिकांना घरपोहोच पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या कामात त्यांना त्यांचे चिरंजीव रोहित व गाडी चालविण्यासाठी कैलास ठोंबरे हे मदत करत आहेत. या कामात त्यांना मोठे समाधान मिळत असल्याचे त्यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले.

पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड आहे. सध्या असलेल्या दुष्काळाच्या भयंकर संकटामुळे महिलांना पाणी आणण्यासाठी मोठी पायपीट व त्रास सहन करावा लागतो. त्यांना पाणी घरपोहोच दिल्याने त्यांचा पाणी आणण्याचा त्रास कमी करू शकलो याचे मोठे मानसिक समाधान आहे.
सतीश निवृत्ती रणधीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)