रांजणगावात भाद्रपद महोत्सवाची भक्‍तीमय वातावरणात सांगता

रांजणगाव गणपती- अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेञ रांजणगाव गणपती येथील भाद्रपद महोत्सवाची अतिशय भक्‍तिमय आणि आनंदमय वातावरणात सांगता झाली. यादरम्यान, सुमारे 5 लाखाहून अधिक भाविकांनी या मुक्‍तद्‌वार दर्शनाचा लाभ घेतल्याचे देवस्थानचे अध्यक्ष डॉ.संतोष दुंडे यांनी सांगितले.
22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या कालावधीमध्ये महागणपती मंदिरात श्री महागणपतीचा भाद्रपद महोत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांनी साजरा करण्यात आला. या महोत्सवा दरम्यान “श्री’च्या बहिणींना आणण्यासाठी पालखी पाठवली जात असून त्याला व्दारयाञा असे संबोधले जात आहे. या व्दारयात्रेत 22 ऑगस्टला पालखी पूर्वव्दार याञेकरिता करडे या गावी, 23ऑगस्टला पालखी दक्षिणव्दार याञेकरिता निमगाव म्हाळुंगी , 24 ऑगस्टला पालखी पश्‍चिमव्दार याञेकरिता गणेगाव खालसा तर, 25 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या मुख्य दिवशी पालखी उत्तरव्दार याञेकरिता ढोकसांगवी या गावी पाठवण्यात आली होती. या पालख्यांचे मानकरी म्हणून अनुक्रमे पाचुंदकर आळी, माळी आळी, लांडे आळी, शेळके आळी यांना पंरपरेनुसार मान देण्यात आला होता.
तसेच वर्षभरात केवळ व्दारयाञेच्या काळात भाविकांना थेट मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जाऊन हस्तस्पर्शाने गणेशमूर्तीचे दर्शन घेता येते. ही संधी केवळ वर्षभरात एकदाच भाविकांना मिळत असल्याने ही भाविकांसाठी एक पर्वणीच असल्याचे देवस्थानचे सचिव प्रा.नारायण पाचुंदकर यांनी सांगितले. चार दिवस चाललेल्या या मुक्‍तद्‌वार दर्शनासाठी राज्यासह देशभरातील भाविक दर्शनासाठी आल्याचे उपाध्यक्ष ऍड.विजयराज दरेकर यांनी सांगितले. श्री क्षेञ रांजणगाव गणपती येथे 400 वर्षापासून “एक गाव एक गणपती’ अशी वैशिष्टयपूर्ण परंपरा आहे.
दिवसेंदिवस महागणपतीच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने कडड बंदोबस्त ठेवला होता. तर ग्रामस्थांसाठी आणि व्दारकऱ्यासाठी स्वतंञ दर्शन व्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून दिल्याने या दर्शनास आलेल्या भाविकास दर्शन घेणे सुलभ झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्‍त केले.
भाद्रपद महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात व्यापारी संकूल आणि महाव्दार परिसरात मनमोहक अशी विद्युत रोषणाई केली होती. मानकरी आणि सेवेकरी बिदागी वाटपाच्या कार्यक्रमाने भाद्रपद महोत्सवाची सांगता करण्यात आली. ही याञा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, देवस्थानचे कर्मचारी आदींचे सहकार्य केल्याचे डॉ.संतोष दुंडे यांनी सांगितले.
यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, कविता खेडकर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, देवस्थानचे माजी विश्‍वस्त दत्तोबा लांडे, बबनराव कुटे, सुवर्णा खेडकर, डॉ.अंकुश लवांडे, डॉ.एकनाथ खेडकर, ऍड. अशोक पलांडे, मकरंद देव, सरपंच सुरेखा लांडे, उपसरपंच नवनाथ लांडे, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश लांडे, उपाध्यक्ष आत्माराम खेडकर, माजी सरपंच भीमाजी खेडकर, ग्रामपंचायत सदस्य दादाभाऊ शेळके, देवस्थानचे व्यवस्थापक रमाकांत शेळके, बाळासाहेब गोऱ्हे, संभाजी गावडे आंदींनी सहकार्य केले. तर रांजणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने तहसीलदार रणजित भोसले आणि पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भोसले, तुषार पंधारे, व्ही.डी. गव्हाणे, नाना काळे, एस.बी.गायकवाड, मंगेश थिगळे, एम.वाय.जगताप, व्ही.पी.शिंदे, एम.बी.कोळेकर, व्ही.आर.कुभांर, एस.बी.काळकुटे, अमोल नलगे, मिंलिंद देवरे आदी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)