रस्त्यावर स्ट्रिट लाईट बसविण्याची मागणी

मांजरी – पुणे-नगर महामार्गाकडे तसेच श्री चिंतामणी गणपती मंदीर थेऊर येथे जाणारे मांजरी बुद्रुक आणि केशवनगर रस्ते तर अंधारात हरवलेच आहेत. तसेच नेहमी वर्दळीचा असणारा मांजरी बुद्रुक-मांजरी खुर्द यांना जोडणारा मुळा-मुठा नदीवरील पुल आणि वळण रस्त्यावरही ही समस्या भेडसावत आहे. याठिकाणी लाईट नसल्याने रात्री सातनंतर या धोकादायक वळण रस्त्यावर वाहने चालविणे धोकादायक ठरत आहे.
मांजरी बुद्रुक रस्त्यावर असलेली स्ट्रिट लाईट काही ठिकाणी बंद आहे. त्यातच ती स्मशानभूमीपर्यंत मर्यादीत आहे. त्याप्रमाणेच मांजरी खुर्द येथील बाजुनेही असलेली लाईट स्मशानभूमीपर्यंतच मर्यादीत आहे. परंतु पुढे असलेल्या मुळा-मुठा नदीवरील पूल आणि पुलाच्या वळण रस्त्यावर स्ट्रिट लाईट नाही. त्यामुळे वाहनांबरोबरच पायी चालणाऱ्यांसाठीही हा रस्ता व पुल धोकादायक ठरत आहे.
पुलावर अंधार असल्याने रात्रीच्यावेळी समोरील वाहनांच्या प्रकाशामुळे काहीच दिसत नाही. परिणामी अनेकदा लहान-मोठे अपघाताच्या घटनाही या ठिकाणी घडल्या आहेत. पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गांना जोडणारा तसेच ट्रॅफिक टाळण्यासाठी अनेकजण या मार्गाचा वापर करतात. परंतु, लाईट अभावी हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने पुल आणि दोन्ही बाजुच्या वळण रस्त्यावर स्ट्रिट लाईट बसवाव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

दुर्घटना होण्याची भीती..
चथुर्थीला अनेक भाविक या रस्त्याचा व पुलाचा वापर करत असून शक्‍यतो संध्याकाळ नंतर या रस्त्यावर गर्दी असते. पुलाची रूंदी कमी असून लाईट नसल्याने येथील वाहतुक धोकादायक ठरत असतानाच पुलाच्या दोन्ही बाजुंना धोकादायक वळणे असून त्याठिकाणी मजबूत असे सुरक्षा कठडे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे दुचाकीस्वार तसेच नव्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहन चालकांना वळणाचा अंदाज येत नसून सुरक्षा कठडे नसल्याने भविष्यात थेट नदीत वाहने जावून मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होण्याची भीती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)