रस्त्यावर खड्डे असताना वाहनचालकांनी टोल का द्यावा?

खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्‍न : सातारा रस्त्यावचे काम संथ गतीने सुरू

पुणे – सातारा रस्त्यावर रिलायन्स कंपनीचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. वारंवार पाठपुरावा करूनही या कामाला गती येत नाही. शिवाय, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणाने यावर तातडीने मार्ग काढावा. रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनचालकांनी टोल का द्यावा, असा प्रश्‍न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

जिल्हाधिकारी कार्यालयात बारामती लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टोलनाक्‍याच्या हद्दीलगतच्या गावांतील रहिवाशांना टोल माफी दिली जाते. सातारा रस्त्यावर शिवापूर आणि सोलापूर रस्त्यावर पाटस टोल नाका येथील स्थानिकांना ही सुविधा देण्यात आली आहे. दौंड तालुक्‍यातील कुरकुंभ येथील टोल नाक्‍यावर स्थानिकांना ही सवलत मिळत नाही. तसेच, एखाद्या वाहनास 24 तासांपेक्षा जास्त वेळ लागल्यास, त्याला पुन्हा टोल भरावा लागतो. त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे नॅशनल हायवेने यामध्ये तातडीने लक्ष घालून उपाययोजना करावी, अशी सूचना खासदार सुळे यांनी केली.

युपीए सरकारच्या कालावधीत पाठपुरावा करून जायकामधून निधी मंजूर करून आणला होता. एवढा निधी मंजूर होऊनही अद्याप त्यातील एकही रुपया खर्च झालेला नाही. हा निधी पिण्याचे पाणी आणि नदीसुधार या करीता मंजूर झालेला आहे. तो खडकवासला धरण आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जे प्रदूषण होत आहे, त्यावर उपाययोजना करण्यासाठी वापरण्यात यावा, अशी सूचना सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. इंदापूर तालुक्‍यातील कुंभारगाव येथे महावितरणच्या सबस्टेशनसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तथापि ही जागा वनखात्याच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे वनखात्याची परवानगी मिळावी, नाहीतर हा निधी परत जाईल. तरी यामध्ये तातडीने लक्ष घालून जागा मंजूर करून द्यावी. यासंदर्भातसुळे यांनी वनखात्याकडे पत्रव्यवहारही केला आहे. दौंड शहरातील नागरिकांनी कचरा डेपोसाठी जागेची मागणी केली आहे. त्यानुसार गंगोत्री एजन्सीने आराखडा केला; मात्र अद्याप पुढे त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दौंड गायरानच्या जागेमध्ये कचऱ्यासाठी जागा देता येते का, याची पाहणी करतो, असे आश्‍वासन दिले.

खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याचे आश्‍वासन
जेजुरीमधील ग्रामीण भाग नगरपालिकेत समाविष्ट करणे, नीरा उजव्या कालव्यातून पाझर तलाव भरणे, इंदापूर तालुक्‍यात पावसाने ओढ दिल्यामुळे पिण्यासाठी, शेतीसाठी व जनावरांसाठी पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. आठ दिवसांमध्ये पाणी सोडणे, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चोपडे यांनी इंदापूरकरांची मागणी मान्य करत खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)