रस्त्यावरील भांडणे सोडविताना एसटीची पोलिसास धडक

अन्य एकजण गंभीर जखमी ः बस चालकावर गुन्हा दाखल
वाकी  -रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना रस्त्यावर युवकांची सुरु असलेली मारामारी सोडविण्यासाठी वाहनातून रस्ता ओलांडून धावत गेलेले चाकण पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यास नाशिक बाजूकडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव एसटी बसने उडविल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना पुणे – नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर शनिवारी (दि. 13) मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास घडली. याच वेळी गर्दीतील आणखी एक युवकही एसटी बसचा धक्का लागल्याने जखमी झाला आहे.
चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप रंगनाथ रसाळ (वय 43, रा. चाकण ) हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या पायाचा गुडघा, छातीची बरगडी यात मोडली आहे. त्यांच्यावर येथील एका रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुण्यातील जहांगीर या रुग्णालयात तातडीच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर अमित संजय साळवी (वय 19, रा. शिक्षक कॉलनी, चाकण) हा देखील याच अपघातात बसच्या धडकेने गंभीर जखमी झाला आहे. चाकण पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आनंदराव पवार (वय 46, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पवार यांच्या फिर्यादीनुसार चाकण पोलिसांनी एसटी बसचालक अनिल विठ्ठल गालफाडे (रा. काळेवाडी, पिंपरी पुणे) याच्यावर या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी (दि. 13) रात्री एक वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या चाकण पोलिसांच्या पथकाला पुणे – नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी (ता. खेड) हद्दीतील उड्डाणपुलावर तुंबळ हाणामारी सुरु असल्याचे दिसले. त्यानंतर पोलीस नाईक संदीप रसाळ पोलीस वाहनातून खाली उतरून रस्ता ओलांडून पलीकडील बाजूस गेले व भांडण सोडवत असतानाच पुणे – नाशिक महामार्गावरून नाशिक बाजूकडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या शिवनेरी एसटी बसची (एमएच 11 टी 9245) त्यांना जबरदस्त धडक बसली. तसेच याच घोळक्‍यातील अमित साळवी यालाही एसटी बसने जोरात ठोकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)