रस्त्याने फडफड करणाऱ्या बुलेट राजांवर वाहतूक शाखेची कारवाई

पुणे,दि.7-रेसिंग बाईक व बुलेट यांच्यावर अनधिकृतपणे मोठा आवाज करणारे सायलेंसरवर लावणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाई केली आहे. तसेच भरधाव वेगात रेसिंग बाईक हाकणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान सोमवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत क 919 वाहनचालकांवर कारवाई करुन 2 लाख 54 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पुणे शहरातील अपघातांच्या वाढत्या प्रमाणावर नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक शाखेने विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. सोमवारी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत भरधाव वेगात रेसिंग बाईक चालविणाऱ्या 36 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली, त्यांच्या कडून 23 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. काही बाईक अल्पवयीन चालक चालवत असताना आढळून आले. त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बुलेट मोटार सायकलला बेकायदेशी वेगवेगळ्या आवाजाचे सायलेंन्सर लावणाऱ्या 200 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 1 लाख 20 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. याबरोबरच ट्रीपल सीट वाहन चालविणाऱ्या 265 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून 42 हजार दंडाची रक्कम वसूल केली आहे. वाहतूकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहने पार्क करणाऱ्या 418 वाहनांना जॅमर लावण्यात आले. त्याच्यांकडून 69 हजार 400 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
वाहतूक शाखेने शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्याकरीता वाहतूकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करुन वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)