रस्त्यात सापडलेले 30 हजार केले परत !प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी केला सत्कार

कराड: हल्ली आपण दैनंदिन जीवनात चोरीच्या, खिसे कापल्याच्या अनेक घटना ऐकतो. कुणी प्रामाणिकपणे एखाद्याचे रस्त्यावर पडलेले पैसे अथवा सामान सर्व मोह बाजूला सारत परत केल्याच्या घटना मात्र आजकाल अत्यंत दुर्मिळ झाल्या आहेत. परंतु एखाद्या बोधकथेला शोभेल अशी घटना कराड येथे घडली आहे.
येथील कासार गल्लीत असलेल्या श्री कालिकादेवी पतसंस्था कार्यालयाबाहेरील रस्त्यात पडलेले 30 हजार रूपये ज्वेलर्स मालकास सापडले. त्यांनी ते प्रामाणिकपणे पोलिसांकडे सुपूर्द केले. त्यानंतर पैसे हरविलेल्या इसमाचा शोध घेऊन पोलिसांनी ते पैसे संबंधितास परत केले. दरम्यान, या प्रामाणिकपणाबद्दल ज्वेलर्स मालकाचा शहर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी सत्कार केला.
याबाबतची माहिती अशी, येथील श्री कालिकादेवी पतसंस्थेच्या बाहेरील रस्त्यावर पडलेले 30 हजार रूपये सुशीला ज्वेलर्सचे मालक अशोक सदाशिव जाधव यांना सापडले. त्यांनी ते पैसे शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेत आणून दिले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सपोनि स्वप्नील लोखंडे, हवालदार राजेंद्र पुजारी, संजय जाधव, प्रदीप कदम, सचिन साळुंखे यांनी माहिती घ्यायला सुरूवात केली.
त्यावेळी गणपतराव ज्ञानदेव लावंड (रा. नांदलापूर, ता. कराड) यांनी पतसंस्थेतून रक्कम काढून नेल्याचे समजले. लावंड यांचा शोध घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्याकडून रक्कमेबाबत खात्री करून घेण्यात आली. ती रक्कम त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ज्यांना पैसे सापडले होते, त्या ज्वेलर्स मालक अशोक सदाशिव जाधव यांच्या हस्तेच गणपतराव लावंड यांना ती रक्कम परत देण्यात आली. तसेच पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पो. नि. सर्जेराव गायकवाड, सपोनि स्वप्नील लोखंडे यांनी जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)