रस्त्याच्या दुरवस्थेकडे कुणी लक्ष देणार का?

-संतप्त जावलीकरांचा लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला सवाल
-मेढा-मोहाट पुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण

प्रसाद शेटे

मेढा – जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या जावली तालुक्‍यातील कुसुंबी येथील काळेश्‍वरी यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली. दरम्यान, कुसुंबी याठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या मुख्य मार्गावर मेढा-मोहाट पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून वारंवार बांधकाम विभागाशी संपर्कही साधला आहे. मात्र बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्षच केले आहे. विशेषत: कुसुंबी येथील काळेश्‍वरी यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक येत असताना भाविकांच्या सोयीचा विचार प्रशासनाकडून होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, लोकप्रतिनिधींकडूनही रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याचेच सध्याचे चित्र असल्याने भाविकांचा काळेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठीचा प्रवास खडतरच असणार आहे. कुसुंबी या देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावरील मेढा-मोहाट पुलाची गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत दुरवस्था झाली आहे. पुलाच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याने प्रवास करत असताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहने या खड्ड्यांमध्ये आदळत असून वाहनधारकांना मणक्‍याची विकार जडू लागले असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तालुक्‍यातील दक्षिण भागाला जोडणाऱ्या या मुख्य रस्त्याबाबत प्रशासनाकडूनही उदासिनात दाखविली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गेल्या वर्षभरात तर या रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. लहान-लहान खड्ड्यांचे आकार आता चांगलेच मोठे झाले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासंदर्भात बांधकाम विभागाला अनेक संघटनांनी वेळोवेळी निवेदन दिली आहेत. मात्र अद्याप संबंधित विभागाने त्याची दखल घेतली नाही. यावर्षीच्या पावसामुळे रस्ता पूर्णत: उखडून मोठे-मोठे खड्डे पडले असून खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताच्या घटनही घडू लागल्या आहेत. याशिवाय भविष्यात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठी दुर्घटना झाल्यास त्याचा जबाबदार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कित्येकदा वृक्षारोपण करून संबंधित विभागाच्या अब्रुची लख्तरे काढली आहेत. तरी सुद्धा या विभागाला जाग येत नाही ही दुर्दैवी बाब मानली जात असून गेड्याच्या कातड्याच्या प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बळीच हवा आहे की काय? असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे.

दुरुस्तीसाठी प्रशासन उदासिन

मेढा-मोहोट हा पुल जावली तालुक्‍याच्या दक्षिण भागातील सुमारे 30 ते 35 गावांना जोडणारा पुला आहे. सध्या या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खड्ड्यामुळे अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावरुन वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे, असे असतानाही संबंधित विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उदासिनता दाखविली जात आहे. त्यामुळे जावळी तालुक्‍यातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आमदारांसाठी धोक्‍याची घंटा

जावली तालुक्‍यातील विकासाकडे आमदारांकडूनही दुर्लक्ष होत असल्याच्या भावना नागरिकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. त्याला कारणही तसेच आहे. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुसुंबी येथील काळेश्‍वरीची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, या मार्गावरील मेढा-मोहाट पुलावरील रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नाही. विशेष म्हणजे जावली तालुक्‍याच्या दौऱ्यावर येणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजेंनाही या रस्त्याची दुरवस्था दिसली नसल्यानेच त्यांनीही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले नसावेत. दरम्यान, आमदारांकडूनही आपल्या मुलभूत प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून व्यक्त होत असलेला संताप हा आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारांसाठी धोक्‍याची घंटा ठरु शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)