रस्त्याचा भराव खचून बसचा अपघात

हडसर येथील घटना ः सहा प्रवाशी जखमी
जुन्नर, -जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील हडसर येथे एसटी बसचा गंभीर अपघात होऊन एसटी बस उलटल्याची घटना सोमवारी (दि. 28) सकाळी दहाच्या सुमारास घडली. निकृष्ट दर्जाचे रस्ते व अरुंद रस्त्यांमुळेच हा अपघात झाल्याची टीका आदिवासी भागातील नागरिकांकडून होत आहे. तर या भीषण अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी दैव बलवत्तर म्हणूनच बचावलो असल्याची भावना व्यक्‍त केली. या अपघातात सहा प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर जुन्नर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असल्याचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जुन्नर बसस्थानकातून सुटलेली एसटी बस (एमएच 12 ईएफ 6105) जुन्नरहून राजूरच्या दिशेने चालली होती. हडसर गावाच्या हद्दीत आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला साईड देण्याचा प्रयत्न चालकाने केला. या प्रयत्नातच रस्त्याची साईडपट्टी खचली व रस्त्यांचा भराव पूर्णतः खचून जाऊन एसटी बस कोसळली.या बसमध्ये असणारे सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. घटनास्थळी जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांनी तातडीने भेट दिली. तर एसटी महामंडळांच्या अधिकाऱ्यांनी दवाखान्यात जखमींची विचारपूस करून त्यांना मदत केली. जखमी झालेले प्रवाशी पुढीलप्रमाणे – बस चालक सुनील दिनकर वायाळ, वाहक जयश्री संतोष डोके (वय 32, रा. जुन्नर), विठाबाई किसन शिदे (वय 55, रा. नारायणगाव), स्वप्नाली शिवाजी डुबरे (वय 18, रा. हडसर), बंडु विठ्ठल सुपे (वय 50, राजुर नं 1(, प्रियंका नवनाथ आहेर (वय 18, हडसर).
या रस्त्यांच्या निकृष्ट कामाकडे लोकप्रतिनिधी, प्रशासन यांचे अक्षम्य दुर्लक्ष आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवावर बेतले जाण्याची भीती आदिवासी भागातील नागरिक व्यक्‍त करत आहेत. या अपघातामुळे आदिवासी भागातील रस्त्यांचा प्रश्‍न ऐरणीवर आला असून लोकप्रतिनिधी यांनी याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)