रस्त्यांवरून उचललेल्या वाहनांचा लिलाव लांबणीवर

पुणे- महापालिकेने रस्त्यांवरून उचललेल्या बिनधनी गाड्यांच्या लिलाव पुढे ढकलण्यात आला असून, यामधील किती गाड्या चोरीच्या आहेत अथवा गुन्ह्यात वापरल्या आहेत का, याचा तपास करण्यासाठी पोलीसांकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत.

रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि अनेक महिने, वर्षांपासून रस्त्यावर धूळखात पडून असलेली सुमारे 691 दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहने महापालिकेने जप्त केली आहेत.

ही वाहने दंड भरून घेऊन जावीत असे जाहीर प्रकटन महापालिकेने दिले होते. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर महापालिकेने या संदर्भात प्रति सात दिवस अशा दोनदा नोटीसाही दिल्या आहेत. त्यानंतरही महापालिकेला हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही.
तसेच यातील काही गाड्या चोरीच्या आहेत का किंवा एखाद्या गुन्ह्यात वापरलेल्या आहेत का याची तपासणी पोलीस करत आहेत. पोलीसांकडे वाहनचोरीच्या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे पोलीसांकडून चासी नंबर तपासला जात आहे. एकूण 691 गाड्यांपैकी 80 गाड्या पोलीसांनी तपासल्या आहेत. उर्वरित गाड्या तपासणी आठवड्यात पूर्ण करण्याची विनंती पोलीसांना केल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.

या सर्व गाड्यांच्या नंबरप्लेटवरून आरटीओकडून गाडीमालकांची यादी मागवण्यात आली आहे. तरीही या गाड्या घेऊन जाण्याबाबत प्रतिसाद नसल्याचे जगताप यांनी सांगितले. तसेच या गाड्या बंद अवस्थेत रस्त्यात सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना भंगाराचे स्वरूप आले आहे. अशा परिस्थितीत या गाड्या घेऊन जाण्यासाठी आकारण्यात आलेला जास्त दंड भरण्याची अनेकांची तयारी नाही. प्रत्यक्षात गाडीची “रीसेल कॉस्ट’ नाही तेवढी त्याची दंडाची रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळेही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारणही पुढे आले आहे.

या गाड्या तपासणीचे काम पोलीसांनी सुरू केले आहे. ते काम आठवड्यात पूर्ण करावे अशी विनंती पोलीसांना करण्यात आली आहे. त्यानंतर उर्वरित गाड्यांच्या लिलावाची तारीख निश्‍चित करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)