मोठ्या गाड्यांची तपासणी : विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती
पुणे – वाहन अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान सुरू झाले आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नियमांविषयी माहिती देण्यात येत असून बुधवारी (दि. 25) प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने रिक्षाचालकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांमध्ये हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच मोठ्या गाड्या आडवून त्यांना रिफ्लेक्टर लावणे, हेडलाईट्सची तपासणी आदी कार्यक्रम घेण्यात आले.
प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जयवंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात आले.
अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. यात विविध कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नियमांविषयी माहिती देण्यात येत आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांना प्रोत्साहन दिले जात आहे. परिवहन विभागतर्फे बुधवारी सकाळी परिवहन कार्यालयात शिकाऊ लायसन्स काढण्यासाठी येणाऱ्यांना हेल्मेटबाबत जनजागृती करण्यात आली. यामध्ये हेल्मेट कसे चांगले आहे, ते वापरण्याचे फायदे आदींबाबत माहिती देण्यात आली. मिशन सेफर रोड या संस्थेचे कल्याण रमन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक अश्विनी जाधव, अमृता भालशंकर उपस्थित होते. तर, सकाळच्या सत्रात फुलेनगर येथील कार्यालयात जवळपास 120 रिक्षाचालकांना जनजागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्याबाबत काळजी घेणे, रिक्षाची तांत्रिक काळजी, प्रवाशांशी व्यवस्थित वागणे आदींवर चर्चा झाली. यावेळी मोटार वाहन निरीक्षक विजय सावंत, राहुल खंदारे, सहायक मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी, निलेश पाटील आदींनी रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले. खेड-शिवापूर टोलनाक्यावर येणाऱ्या मोठ्या गाड्या अडवून रिफ्लेक्टर लावणे, हेडलाईट्स तपासणे तसेच चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक विजयसिंह भोसले, अमर गवारे, संदीप म्हेत्रे आदींनी यावेळी तपासणी मोहीम राबवली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा