रस्ते खोदाईत कर्मचाऱ्यांचा सहभाग?

हडपसर रस्ता परिसरातील प्रकार : माहिती असूनही कारवाईस टाळाटाळ

पुणे – महापालिकेकडून शहरात कोणत्याही मोबाईल कंपनीस परवानगी दिलेली नसताना हडपसर रस्त्यावर भैरोबानाला ते क्रोम शोरूमपर्यंत 1 किलोमीटरची रस्ते खोदाई झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या खोदाईची कल्पना पथ विभागातील अधिकाऱ्यांना असतानाही तसेच ज्या कंपनीची केबल आहे त्या कंपनीचे नाव माहित असतानाही, पथ विभागाने याबाबत मौन बाळगले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संगनमतानेच झाल्याची चर्चा महापालिकेत आहे. तर, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे कंपन्यांना गुपचूप परवानगी देऊन महापालिकेचा महसूल बुडविला जात असल्याचेही चित्र आहे.

शहरात विविध मोबाईल कंपन्यांबरोबर महावितरण, एमएनजीएल या कंपन्यांकडून सेवा वाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदाई केली जाते. त्यासाठी महापालिका शुल्क आकारणी करते. दरवर्षी 1 ऑक्‍टोबरपासून या खोदाईस परवानगी दिली जाते. मात्र, यावर्षी शहर सुधारणा समितीने या उघड्यावर केबल वाहिन्या टाकण्याबाबत धोरण तयार होईपर्यंत रस्ते खोदाईस परवानग्या देऊ नये, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेला रस्ते खोदाईच्या परवानग्या दिलेल्या नाहीत. त्यात आता केवळ महावितरण आणि एमएनजीएल या कंपन्यांनाच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ज्या मोबाईल कंपन्याकडून पालिकेला खोदाईच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. त्यांना आता जवळपास दीड महिना होत आला असला तरी अद्याप परवानग्या देण्यास सुरवात केलेली नाही. असे असतानाच दिवाळी सुट्टीचा फायदा घेत वानवडी भागातील भैरोबानाला ते क्रोमा शोरुमपर्यंत 1 किमी अंतरात अनधिकृतरित्या रस्ते खोदाई करून केबल टाकण्यात आली आहे. मात्र, संबंधित कंपनीची केवळ केबल जप्त करण्याची कारवाई पथ विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी केली आहे.

फौजदारी कारवाईचे आदेश
याबाबत पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांना प्रकाराची माहितीच अद्याप देण्यात आली नसल्याचे समोर आले. तर, याबाबत त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता, या कर्मचाऱ्याला काहीच उत्तर देता आले नाही. त्यामुळे ही खोदाई पालिकेच्या संगनमतानेच सुरू असल्याचे चित्र आहे. तर पावसकर यांनी ही केबल ज्या कंपनीची आहे त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

वेळ नेली मारून…
पत्रकारांनी या प्रकरणाची माहिती पावसकर यांच्या कार्यालयातच विचारली असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यास तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यांच्या समोरही या कर्मचाऱ्याने या कंपनीस आधीची खोदाई परवानगी असेल असे सांगत त्यांना पत्र पाठवून विचारणा करण्याची भूमिका घेतली. त्यावेळी पावसकर यांनी ही माहिती का देण्यात आली नाही याची विचारणा केली असता दिवाळीच्या सुट्टीत हा प्रकार घडला असल्याचे सांगत वेळ मारून नेली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)