रस्ते अपघाताला आळा घालण्यासाठी सोमवारपासून विशेष मोहिमेला प्रारंभ

मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन


2017 मध्ये 12 हजार व्यक्ती ठार


अपघातात 25 ते 45 वयोगटातील व्यक्तीची संख्या सर्वाधिक

मुंबई  : राज्यातील रस्त्यांवरील वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य शासनाने रस्ता सुरक्षेची मोहीम हाती घेतली आहे. 23 एप्रिल ते 7 मे या पंधरवड्यादरम्यान चालणाऱ्या या विशेष मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे.

राज्यात एकूण 743 अपघातग्रस्त ठिकाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्‍चित करण्यात आले आहेत. रस्त्यावरील वाढते अपघात मृत्यू ही चिंताजनक बाब असून 2017 या वर्षात एकूण 35 हजार 853 अपघात झाले. यावर्षात एकूण 12 हजार 264 व्यक्ती रस्ते अपघातात मृत पावल्या तर 32 हजार 128 व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातात 25 ते 45 वयोगटातील व्यक्तीची संख्या मोठी असल्याचे आढळले आहे. राज्यातील अपघातग्रस्त ठिकाणावर सुधारात्मक उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहे. राज्यातील वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र तपासणीसाठी देशातील पहिले स्वयंचलीत चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात 35 परिवहन कार्यालयात ब्रेक तपासणी चाचणीची सुविधा उभारण्यात आली आहे.

-Ads-

राज्यात अपघातोत्तर वैद्यकीय सुविधा पुरविण्यास्तव एकुण 108 ट्रॉमा केअर सेंटर कार्यरत आहेत. तसेच 108 क्रमांकाच्या एकूण 937 म्ब्युलन्स 24 तास कार्यरत आहेत. रस्ता सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या सर्व निर्देशांची पूर्तता करण्यात आली आहे. राज्याचा सन 2020 पर्यंतचा रस्ता सुरक्षा कार्यआराखडा अंतीम करण्यात येत आहे. प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांमध्ये महामार्ग पोलीस, मुंबई वाहतूक पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्या विविध योजनांसाठी प्रस्तावित 42 कोटींच्या प्रस्तावास तत्वत: मान्यता दिली आहे.

रस्ते अपघातामध्ये राज्याचा तिसरा क्रमांक….
राज्यात मार्च अखेरपर्यत 3 लाख 28 हजार नोंदणीकृत वाहने तर 3 लाख 40 हजार परवानाधारक वाहनचालक आहेत. राज्यातून प्रवास करणारी व राज्याबाहेरील वाहनांची मोठी संख्या आहे. देशपातळीवर अपघाती मृत्यू या निकषावर राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यातून प्रवास करणाऱ्या आणि राज्याबाहेरील वाहनांची मोठी संख्या हे एक मोठे आव्हान आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)