रस्ता सुरक्षेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करा

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील


रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्‌घाटन

पुणे- जगात सर्वाधिक अपघात भारतात होतात. देशात दरवर्षी दीड लाख जणांचा मृत्यू होतो. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात दररोज सरासरी तीन ते चार जण रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. हे अपघात थांबले पाहिजे. याबाबत जनजागृती करण्यासोबतच रस्ता सुरक्षा या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केला पाहिजे, असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मांडले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, परिवहन विभाग आणि पुणे शहर पोलीस यांच्या वतीने “29 वे रस्ता सुरक्षा अभियान 2018’चे उद्‌घाटन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सहआयुक्त रवींद्र कदम, वाहतूक शाखेचे उपायुक्त अशोक मोराळे, उपायुक्त सारंग आवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य रवींद्र परदेशी आदी उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, अपघातात वाढ हा अतिशय गंभीर विषय आहे. यावर केवळ चर्चा न करता यापुढे अपघात कमी करणे आणि वाहतूक अधिक सुरक्षित कशी करता येईल यावर काम केले पाहिजे. रस्त्याची कामे वेळेवर न झाल्यामुळे ट्रॅफिक जाम होणे तसेच अपघात होतात, असेही ते म्हणाले.

शिरोळे यांनी रस्ता सुरक्षा या महत्त्वाच्या कार्यक्रमात पुणे महापालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, पुणे शहरात रस्ता ओलांडणे कठीण झाले असून पादचारी सुरक्षित नसल्याचे अधोरेखित केले.

नवलकिशोर राम म्हणाले, विविध दुर्धर आजाराने माणसाचा मृत्यू होतो. त्यासारखेच अपघातातही नागरिक बळी पडत आहेत. नागरिकांना कायद्याची माहिती आहे. मात्र, कर्तव्याचा विचार करीत नाहीत. वाहतूक नियम पाळले पाहिजेत. अतिवेग आणि मद्यपान करून वाहन पळविल्यामुळे प्रामुख्याने अपघात होतात. त्यात सर्वाधिक पादचारी आणि दुचाकीचालकांचा समावेश आहे.

रस्ता सुरक्षेकडे आमदारांचे दुर्लक्ष
सर्वात ज्येष्ठ खासदाराच्या अध्यक्षतेखाली देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये रस्ता सुरक्षा समिती तयार केली आहे. त्यामध्ये लोकप्रतिनिधी, महापौर, शासकिय अधिकारी सदस्य आहेत. पुणे जिल्ह्यात 28 आमदार आहेत. मात्र, गत आठवड्यात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत एकही आमदार उपस्थित नव्हता ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. सर्व जण हा विषय गांभिर्याने घेत नसल्याबद्दल खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खंत व्यक्त केली.

जिल्ह्यात 62 ब्लॅक स्पॉटस
पीडब्ल्यूडी आणि नॅशनल हायवे ऑथेरिटीच्या सहाय्याने जिल्ह्यातील रस्त्यावर वारंवार अपघात होणारी ठिकाणे शोधून ब्लॅक स्पॉटची यादी तयार केली आहे. ते तातडीने दुरूस्त केले तर अपघाताची संख्या कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यात अशा प्रकारे 62 अपघाताचे स्पॉट आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)