रस्ता सुरक्षा ही चळवळ व्हायला हवी – आनंद पाटील

पिंपरी – अपघातामध्ये आपल्या देशात सर्वाधिक बळी हे पादचाऱ्यांचे जातात. त्यापाठोपाठ दुचाकी चालक हेल्मेट वापरण्यास तयार नाहीत. हे दुर्देव असून दुचाकी चालकांचा मृत्यू हेही अत्यंत घातक आहे. वेगावरील बेजबाबदारपणाबाबत जनजागृती करणे गरजेचे असून रस्ता सुरक्षा ही चळवळ निर्माण व्हायला हवी, असे मत उपप्रादेशिक अधिकारी आनंद पाटील यांनी व्यक्‍त केले.

वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व लोकमान्य रुग्णालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने 29 व्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना अपघात मित्र हे ओळखपत्र व सन्मानपत्र देण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आनंद पाटील बोलत होते.

-Ads-

आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे, वाहतूक पोलीस उपायुक्त राजेंद्र भामरे, पोलीस उपायुक्त सतीश पाटील, निगडी पोलीस ठाण्याचे निरिक्षक विजय पळसुले, महामार्ग पोलीस निरीक्षक हागवणे, परिवहन अधिकारी विधाते, पोलीस निरिक्षक पवार, लोकमान्य रुग्णालयाच्या डॉ. सोनाली लोहकरे, ट्रॉमा विभाग प्रमुख डॉ. आशिष सूर्यवंशी, डॉ. श्रीकृष्ण जोशी, सुनील काळे आदी उपस्थित होते.

आमदार चाबुकस्वार म्हणाले की, नागरिकांनी संवेदशील होऊन अपघातग्रस्तांना मदत करावी, रिक्षा चालकांनी यात महत्त्वाची कामगिरी बजवावी. वाढत्या वाहनाबरोबरच वाहन जबाबदारीने चालवून सुरक्षित राहण्याचे भान ठेवावे. पिंपरी कॅम्पमधील वाहतुकीची स्थिती पाहून लोकप्रतिनिधींच्या मदतीने प्रशासकीय अधिकाऱ्यांची योजना आखून नियोजन करावे. दुचाकी चालकांनी मेंदूचे अवयव प्रत्यारोपण अजून होत नसल्याने प्राणाचे महत्व जाणून हेल्मेट वापरावे. लोकमान्य रुग्णालय राबवत असलेला अपघात मित्र हा उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम शहरभर चळवळ ठरावा, अशी अपेक्षा आमदार गौतम चाबुकस्वार यांनी व्यक्त केली.

लोकमान्य रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य यांनी अपघात मित्र या संकल्पनेद्वारे हॉटेलवरील कर्मचारी, ढाबा चालक, रिक्षा चालक, पोलीस मित्र संघटनेतील सदस्य अशा पाच हजारहून अधिक नागरिकांना अपघातग्रस्तांच्या मदतीचे प्रशिक्षण दिले आहे. डॉ. आशिष सूर्यवंशी यांच्या मदतीने प्रशिक्षण मॉडेल तयार करण्यात आले असून प्रशिक्षण प्रयोगशाळा उभारण्यात आली असल्याची माहिती लोकमान्य रुग्णालयाचे कार्यकारी सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी दिली.

अपघातग्रस्तांना शास्त्रीय पद्धतीने मदत करून प्राण वाचवणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रास्ताविक केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)