मॉस्को : रशियाचे मालवाहू अंतराळयान खाद्यसामग्री, इंधन आणि अन्य आवश्यक सामान वाहून नेत विक्रमी 3 तास 40 मिनिटांमध्ये पृथ्वीवरून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पोहोचले आहे. पहिल्यांदाच कोणत्याही अंतराळयानाने पृथ्वीच्या कक्षेत स्थापित आयएसएसपर्यंतचा प्रवास इतक्या जलदपणे पूर्ण केला आहे. या अगोदर कोणत्याही अंतराळ यानाचा आयएसएसवर पोहोचण्याचा विक्रमी कालावधी 5 तास 39 मिनिटांचा होता.
प्रोगेस एमएस-09 यानाने स्थानिक प्रमाणवेळेनुसार मंगळवारी पहाटे 3 वाजून 51 मिनिटांनी कजाकस्तानच्या बैकानूर अंतराळ प्रक्षेपण स्थळावरून उड्डाण भरले. मानवरहित अंतराळयान सुमारे 3 टन सामग्री वाहून नेत 4 तासांच्या आतच आयएसएसवर पोहोचले.
सोयूज बुस्टर अग्निबाणाची अत्याधुनिक आवृत्ती 2.1 मुळे यानाचा अत्याधिक वेग शक्य झाल्याचे रशियाची अंतराळ संस्था रॉसकोमोसने म्हटले आहे. या अग्निबाणाची मागील वर्षी चाचणी होणार होती, परंतु ऑक्टोबर 2016 मध्ये अंतिम क्षणी तांत्रिक बिघाडामुळे याचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले होते. आयएसएसमध्ये सध्या नासाचे अंतराळवीर ड्रू फ्यूस्टेल, रिकी अर्नोल्ड आणि सेरेना औनॉन यांच्यासोबतच युरोपीय अंतराळ संस्थेचे अलेक्झांडर गेरेस्ट आणि रशियाचे ओलेग आर्टेमयेव्ह तसेच सर्गेई प्रोकापीव्ह कार्यरत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा