रवींद्र मराठेंकडील पदभार काढला…

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कारवाई
पुणे – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसकेडीएल या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणात बॅंक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता मराठे यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्यासह बॅंकेचे कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांचेही सर्व अधिकार काढून घेण्यात आले.

मराठे यांना जामिन मंजुर झाल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आज (शुक्रवारी) बॅंकेच्या पुण्यातील लोकमंगल या मुख्यालयात तातडीची बैठक झाली. या बैठकीस दिल्लीहून केंद्र सरकारचे दोन प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुप्ता यांना पुण्यातच थांबण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील निर्णय केंद्र सरकार घेणार असल्याचे समजते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या डीएसकेडीएल या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कर्ज दिल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मराठे व गुप्ता यांच्यासह बॅंकेचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत व तत्कालिन विभागीय व्यवस्थापक नित्यानंद देशपांडे यांना अटक केली होती. त्याचवेळी डीएसके यांचे सनदी लेखापाल सुनील घाटपांडे व डीएसके समूहातील एका कंपनीच्या उपाध्यक्षालाही अटक करण्यात आली होती.

सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तीला अटक होऊन दोन दिवसांहून अधिक काळ पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यास त्या व्यक्तीचे निलंबन होते. त्याचबरोबर प्रचलित नियमांनुसारच चौकशीनंतर त्यांना पुन्हा कामावर घेता येते. याच नियमाला अनुसरुन ही कारवाई झाल्याचे समजते. त्यामुळे हे दोघेही यापुढे बॅंकेत कार्यरत राहिले तरी त्यांना कोणत्याही स्वरूपाचे कार्यकारी अधिकार असणार नाहीत, असे बॅंकेने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे.

दरम्यान, पुण्यात झालेल्या या बैठकीबद्दल प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. बॅंकेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आज ही बैठक होणार असल्याबद्दल कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. बैठकीत झालेल्या या निर्णयामुळे बॅंकिंग वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)