रयत शिक्षण संस्थेतून शेतकरी, कष्टकरी व बहुजनांना शिक्षणाच्या संधी – काळे 

कोपरगाव – कर्मवीर भाऊराव पाटलांनी शेतकरी, कष्टकरी व बहुजनांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊराव पाटलांचा ज्ञानदानाचा यज्ञ अखंडपणे पुढे सुरु ठेवून शंकररावजी काळेंनी राज्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील गावागावात रयत शिक्षण संस्थेच्या शाळा स्थापन करून रयत शिक्षण संस्थेचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य युवा नेते आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्‍यातील करंजी येथे केले.
तालुक्‍यातील करंजी येथील कर्मवीर शंकररावजी काळे विद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी शाळेला देणगी देणाऱ्या देणगीदारांचा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व स्कूल कमिटीचे चेअरमन कारभारी आगवण होते. यावेळी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचा रथ तयार करण्यात आला. या रथावर एक बाजूला कर्मवीर भाऊराव पाटील व दुसऱ्या बाजूला कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या. तसेच या चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत ढोल ताशाच्या गजरात क या रथाची मिरवणूक काढण्यात आली. विद्यालयाचे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. विद्यालयात शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नियमितपणे रोज नवनवे उपक्रम सुरु आहेत. यावेळी काढण्यात आलेल्या रांगोळ्यांनी उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळत असतांना कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी 125 पेक्षा जास्त नवीन शाळा महाविद्यालय सुरु करून रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाच्या पारंब्या ग्रामीण भागाच्या मातीत घट्टपणे रोवल्या गेल्या असल्याचे सांगितले. यावेळी एस. एस. जी. एम. महाविद्यालयाचे प्रा. किरण ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, विमलताई आगवण, उपसभापती अनिल कदम, कारभारी आगवण, शिक्षणाधिकारी शबाना शेख, बांधकाम विभागाचे क्षीरसागर, नाना आगवण, सांडूभाई पठाण, रोहिदास होन, कारखान्याचे संचालक संजय आगवण, गौतम बॅंकेचे संचालक अनिल महाले,सरपंच छबू आहेर, ग्रामसेवक गुंड, आबा शिंदे, नाथा आगवण, बापू वढणे, कारभारी भिंगारे, मच्छिंद्र भिंगारे, वाल्मिक भिंगारे, भास्कर शहाणे, दत्तू बोठे, नवनाथ आगवण, केशवराव चरमळ, मुकुंद आगवण, गोपाल कुलकर्णी आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढण्यासाठी कलाशिक्षक संदीप चव्हाण व सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक दिनकर माळी यांनी केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)