रमझान महिन्यात सर्च ऑपरेशनला स्थगिती

केंद्र सरकाराकडून मेहबुबा मुफ्ती यांच्या प्रस्तावाला मंजूरी
नवी दिल्ली – रमझान आणि अमरनाथ यात्रा दरम्यान जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांचे सर्च ऑपरेशन न राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रजमान महिन्यात लष्कराकडून राबविण्यात येत असलेल्या कारवाई बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, दहशतवादी हल्ल्याची शक्‍यता निर्माण झाल्यास प्रत्युत्तर कारवाई करण्याची सूट केंद्राने दिली आहे.

याबाबत गृहमंत्रालयाने रमझान महिना सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर बुधवारी ट्विटरवर माहिती दिली. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, मुस्लिम बांधवांना पवित्र रमझान महिन्यात शांती व्यवस्था राखण्यासाठी सरकारकडून घाटीमध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन सर्च ऑपरेशन सुरू न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्वतः मेहबूबा मुफ्ती यांनी माहिती दिली आहे.

गृह मंत्रालयाने केलेल्या अन्य एका ट्‌वीटमध्ये सुरक्षा दलास काश्‍मीरी जनतेच्या सुरक्षतेसाठी आणि लष्करावर हल्ला झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा सर्वाधिकार भारतीय जवानांना असून याचे संपूर्ण स्वतंत्र त्यांना असल्याचा उल्लेख केला. पवित्र रमझान महिन्यात कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, असे म्हटले आहे.

मुफ्ती सरकारकडून निर्णयाचे स्वागत
केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि विरोधी पक्षनेते ओमार अब्दुल्ला यांनी स्वागत करत आभार मानले. पंतप्रधानांचे आभार मानत मेहबुबा यांनी ट्‌विट केले की, पवित्र रमझान महिन्यात सर्च ऑपरेशन न राबविण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करते. या निर्णयाबद्दल नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते. तसेच त्या राजकीय पक्षांचेही आभार मानू इच्छिते, ज्यांनी सर्वपक्षीय बैठकीत या प्रस्तावावर सहमती दर्शविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)