रमजान ईदमुळे बाजारात उत्साह

पिंपरी – मुस्लिम बांधवांचा सण रमजान ईद अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपरी बाजार सध्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. टोपी, सुरमा, अत्तर, बांगड्या, मेहंदी कोन, नवीन कपडे, बुरखे, सुका मेवा आणि शेवया यांच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे दुकांनामध्ये पाय ठेवायला देखील जागा शिल्लक नाही.

मुस्लिम बांधवांचे रमजान महिन्यातले उपवास सुरू आहेत. त्यामुळे बाजारात शिरखुरमा तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शिरखुरमा तयार करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या शेवयाचे वेगवेगळे प्रकार दिसून आले. यामध्ये किमामी, बनारस आणि सुपफेनी बाजारात दाखल झाले आहेत. यामध्ये सुपफेनी वेगवेगळ्या रंगात असल्यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुकामेवा खरेदीसाठी देखील ग्राहक आघाडीवर असून खोबरा, काजू, खारिक, बदाम, आक्रोड, पिस्ता, काळा मनूका, खजूर, चारोळी आणि अंजीर यांची आवक वाढली असून ग्राहकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाजारात वेगवेगळ्या आणि आकर्षक डिझाइनच्या टोप्या दाखल झाल्या आहेत. यामध्ये विदेशी टोपींची जास्त भर दिसून आली. इंडोनेशियन, अफगाणी, कश्‍मिरी, तुर्की, लखनौई, मौलाना साद, निजामुद्दीन मर्कज आणि फॉर्म आदी टोप्या बाजारात मिळत आहेत. त्यामध्ये काश्‍मिर टोपी भाव खाऊन जात असून तिची मागणी सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर मुलांसाठी कपड्यांमध्ये लखनौई, पठाणी आणि शेरवाणी आकर्षक डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. महिलांसाठी विशेष आणि विविध डिझाइनचे बुरखे मिळत असून त्यांची मागणी अधिक होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

अत्तराचे जन्नतउल्ल फिरदौस, सौफ्ट, सफा, मुखल्लत आदी प्रकार आहेत. याची आवक मुंबईवरून होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मेहंदीचे कोन, सुरमा आणि आकर्षक बांगड्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये बांगड्याचे विविध प्रकार दिसून आले. लाखपासून तयार केलेल्या बांगड्यांना विशेष मागणी असल्याचे अलशिफा कॅप मर्चंट येथील विक्रेत्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)