‘रनमशीन’ मयांककडे दुर्लक्षच? 

अमित डोंगरे 

कर्नाटकचा रणजीपटू मयांक अग्रवाल याने यंदाच्या मोसमात खोऱ्याने धावा ओढल्या आहेत. मात्र, निवड समितीने साधे त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. अशीच गत “रनमशीन’ ठरणाऱ्या खेळाडूंची होणार असेल तर भारतीय संघाला पर्यायी खेळाडू मिळणार कसे? आणि आपण विराट कोहली या एकट्या शिलेदारावर किती काळ विसंबून राहणार? 

सुनील गावसकर जेव्हा भारतीय संघात होते, तेव्हा त्यांच्या धावा झाल्या तर भारत सामना जिंकायचा किंवा कसोटी सामना वाचवायचा. हीच जबाबदारी नंतर चोवीस वर्षे सचिन तेंडुलकरने सांभाळली आणि आता विराट कोहली सांभाळत आहे. एखाद्या सामन्यात शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्‍य रहाणे धावा करतात पण त्यानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ हीच गत असते. एकहाती फलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावर वाहून इतर फलंदाजांना हाताशी धरत मोठी धावसंख्या उभारणे अगर धावखंख्येचा पाठलाग करणे हे केवळ सातत्याने कोहली करत आहे. मग अशा वेळेस देशांतर्गत स्पर्धेत धावांची रास ओतणाऱ्या मयांक अग्रवालसारख्या खेळाडूंना संघात संधी देऊन बघायला काय हरकत आहे. सातत्याने अपयशी ठरत आलेल्या रोहित शर्माला बदली कर्णधार म्हणून श्रीलंकेतील टी-20 तिरंगी मालिकेसाठी रवाना केले. त्याच्या कपाळावर कर्णधारपदाचा ‘टिळा’ ही लागला. मात्र मयांक अग्रवालसारख्या खेळाडूंना एकाच मोसमात दोन हजारांपेक्षा जास्त धावा करूनही घरीच ‘हरी-हरी’ करायला लावताना निवड समितीला काहीच वाटले नाही.

रणजी करंडकात एका त्रिशतकासह एकूण पाच शतके फटकावूनही जर निवड समितीच्या नजरेत त्याची कामगिरी भरणार नसेल तर निवड समितीच्या सगळया सदस्यांना डोळे आहेत का बटणे असा प्रश्‍न पडतो. वीरेंद्र सेहवागच्या फलंदाजीचा चाहता असणारा मयांक सेहवागप्रमाणेच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र, सेहवागपेक्षा कितीतरी चांगले त्याचे तंत्र आहे. अर्थात त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी दिली गेली आणि ती देखील योग्य वेळी भरात असताना तरच त्याचा दर्जा सिद्ध होईल नाहीतर त्याच्यावर टीका करायला उत्तर भारतात भरपूर टीकाकार बसलेलेच आहेत. बंगलोर, दिल्ली डेअरडेव्हिल्स्‌ आणि रायझिंग पुणे सुपरजायंटस संघाकडून त्याने आयपीएलमध्येही (इंडियन प्रिमीअर लीग) सहभाग घेतला होता. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने विकत घेतले आहे. बघा म्हणजे ज्या खेळाडूची कामगिरी पंजाब संघाचा मालकाच्या नजरेत भरते पण राष्ट्रीय निवड समितीच्या नजरेत भरत नाही यापेक्षा हास्यास्पद गोष्ट कोणतीही असू शकत नाही. त्याने अजुन काय केले म्हणजे त्याचा विचार होईल. याला अन्याय म्हणत नाहीत का ? एकीकडे रोहित शर्मासारखे जागा टिकवतात आणि मयांकला अन्याय सहन करावा लागतो हाच मंडळाचा पारदर्शक कारभार म्हणायचा का?

पदार्पणापासूनच यशस्वी 
1991 साली बंगळूरला जन्माला आलेला मयांक शालेय क्रिकेट बिशप कॉटन बॉईज स्कूलकडून खेळला. त्याचवेळी त्याच्या आक्रमक शैलीची चर्चा स्थानिक स्तरांवर तसेच वृत्तपत्रांतून सुरू झाली होती. महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर त्याने जैन युनिव्हर्सिटीकडून धावांचा रतीब ओतला. याच सुमारास त्याची निवड कर्नाटक संघात रणजी करंडक स्पर्धेसाठी झाली. त्यापूर्वी एकोणीस वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेत आणि एकोणीस वर्षाखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. विश्‍वकरंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असा मानही त्याने मिळवला होता. 2010 मध्ये कर्नाटक प्रिमीअर लीग स्पर्धेत स्पर्धेचा मानकरी मयांकच ठरला होता. टी-20 प्रकारच्या या स्पर्धेत त्याने आपले पहिले टी-20 शतक साकार केले होते. महाराष्ट्राविरुद्धचा 2017 सालच्या रणजी सामन्यात नाबाद 304 धावांची खेळी करत आपल्या कारकिर्दीतील तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले वहिले त्रिशतक फटकावले होते. याच स्पर्धेत त्याने एक हजार धावाही पूर्ण केल्या.

2017-18 या मोसमात रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या मोसमात रणजी स्पर्धेत 1160 धावा फटकावल्या. विजय हजारे करंडक स्पर्धेतही 723 धावा करत सर्वाधिक धावा करणारा मयांक स्पर्धेचा मानकरी ठरला होता. आतापर्यंत केवळ 34 प्रथम दर्जाच्या सामन्यात त्याने पाच शतक आणि पंधरा अर्धशतके यांच्या मदतीने 2514 धावा केल्या आहेत. यात एक त्रिशतक आहे. गेल्या पाच वर्षात कर्नाटकने तीनवेळा विजय हजारे ही रणजी नंतरची सर्वाधिक मानाची स्पर्धा जिंकली. यंदा त्यात अंतिम सामन्यात मयांकच्या 90 धावांच्या खेळीचे मोठेच योगदान होते. ‘लिस्ट ए’ च्या 46 सामन्यांतून पाच शतके व आठ अर्धशतके यांच्या सहाय्याने त्याने 1879 धावा केल्या आहेत. टी-20 च्या 91 सामन्यात एक शतक व बारा अर्धशतकांच्या मदतीने त्याने 1962 धावा फटकावल्या आहेत. भारतीय

संघात घेण्यासाठी ही कामगिरी पुरेशी नाही का? 
रोहित शर्माचे समजू शकतो त्याला विश्रांतीची गरजच नव्हती. गेल्या दीड वर्षात भारतीय संघातून खेळताना सातत्याने जास्तवेळा त्याने खेळपट्टीपेक्षा ड्रेसिंगरूममध्येच तर घालवला आहे आणि नव्या खेळाडूंबरोबर थोडासा अनुभवी खेळाडू असावा म्हणून नेतृत्व त्याच्याकडे सोपवले असावे. म्हणतात ना ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ तोच हा प्रकार. अर्थात अन्याय झालेला मयांक काही पहिलाच खेळाडू नाही. शोधले तर शेकडो खेळाडू सापडतील की ज्यांच्यावर त्या त्या काळात अन्याय झाला आहे. महाराष्ट्राच्या संतोष जेधेपासून इश्‍वर पांडे पर्यंत आणि प्रियांक पांचाळपासून गौतम गंभीरपर्यंत किती तरी खेळाडूंची नावे घेता येतील. श्रेयस अय्यर, केदार जाधव यांना जशी योग्यवेळी योग्य संधी दिली तशीच मयांक अग्रवालसारख्या खेळाडूंबाबतही दृष्टीकोन निवड समितीने ठेवला पाहिजे. मयांकसारख्या खेळाडूंचा आत्मविश्‍वास खच्ची झाला तर त्याचा परिणाम सगळयाच नवोदित खेळाडूंवर होईल.

कोटा पद्धत बंद व्हावी 
भारतीय क्रिकेटला सगळयात जास्त मारक कोणती गोष्ट ठरत असेल तर ती ‘कोटा पद्धत’ होय. निवड समितीचे अध्यक्ष आणि सदस्य याच कोटा पद्धतीनुसार वर्षानुवर्षे संघाची निवड करत आले आहेत. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्याशी केवळ औपचारिकता म्हणून संवाद साधला जातो ही वस्तुस्थिती आहे. त्याला सौरव गांगुली, धोनी आणि कोहली हे काही प्रमाणात अपवाद आहेत कारण त्यांनी एखादया खेळाडूसाठी निवड समितीलाही निर्णय बदलायला भाग पाडले आहे. पण प्रत्येक खेहाडूसाठी कर्णधारानेच का जोर लावयचा यातून चुकीचा पायंडा पडण्याचाही धोका आहेच की. त्यापेक्षा ही कोटा पद्धत पूर्णपणे बाद करून ज्याची कामगिरी सातत्यपूर्ण आहे त्यांनाच संधी दिली गेली तर कोणावर अन्याय झाला असे म्हणातच येणार नाही. बघू या निवड समितीच्या डोळयात थोडा तरी प्रकाश भविष्यात पडतो का ?

मयांक ठरला ‘रनमशीन’ 
कर्नाटककडून प्रथम दर्जाचे क्रिकेट खेळणारा मयांक यंदाच्या मोसमात धावा काढण्याचे मशीन ठरला. त्याने 2017-18 या मोसमात नऊ शतके आणि आठ अर्धशतके यांच्या मदतीने एकूण दोन हजार 141 धावा कुटल्या आहेत. यात रणजी करंडकात 1160, विजय हजारे स्पर्धेत 723 आणि सईद मुश्‍ताक अली
स्पर्धेत 288 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी निवड समिती दुर्लक्षीत करते यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असणार ? निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के.प्रसाद म्हणतात की, आम्ही मयांकशी बोललो आहोत, त्याला अजून थोडी वाट पाहावी लागेल इतरही काही खेळाडू रांगेत आहेत.” काय निर्लज्जपणा आहे ना या प्रसाद यांचा. अहो जो खेळाडू आता भरात आहे त्याला लगेचच संघात स्थान देणे चांगले का दोन वर्षापूर्वी सरस कामगिरी केली म्हणून रांगेत असलेल्याला खेळवणे चांगले.

श्रीलंकेत न्यायला हवे होते 
श्रीलंकेत सुरू असलेल्या स्वातंत्रता चषक स्पर्धेसाठी जो भारतीय संघ निवडला गेला त्यात नियमित कर्णधार विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्‍वर कुमार, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली गेली आहे. यांच्या जागी रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवून, के. एल. राहुल, दिपक हुडा, सुरेश रैना, मनिष पांडे, दिनेश कार्तिक, शिखर धवन, वॉशिग्टन सुंदर, अकसर पटेल, यजुर्वेन्द्र चहल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि पर्यायी यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत यांना संधी देण्यात आली आहे. खरे पाहता शिखर धवनला देखील विश्रांती दयायला हवी होती तो देखील गेली दीड वर्षे सातत्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. दिपक हुडा आणि के. एल. राहुल यांची निवड भुवया उंचावणारी ठरली आहे. या दोन्ही फलंदाजांनी मयांक अग्रवालच्या जवळपास जाणारी देखील कामगिरी केलेली नाही मग त्यांना ही ‘लॉटरी’ लागली असा समज करून घ्यायचा का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)