रणजी करंडक स्पर्धेत एका फेरीची भर पडणार? 

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर 
नवी दिल्ली – बीसीसीआयने 2018-19 या आगामी वर्षासाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले असून नव्या मोसमाची सुरुवात विजय हजारे करंडक स्पर्धेने होत आहे. तसेच यंदा रणजी करंडक स्पर्धेत आणखी एका फेरीचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोलकाता येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत झालेल्या विस्तृत चर्चेअंती या वर्षीच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या वार्षिक वेळापत्रकाची घोषणा केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अग्रस्थान असणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेतील सध्याच्या स्वरूपात बदल करून जादा फेरीचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी रणजी संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी केली आहे. त्याच आधारावर या बैठकीत तांत्रिक समितीने हा बदल सुचविला आहे.

सध्या रणजी करंडक स्पर्धेतील संघांची चार गटांत विभागणी करण्यात येते व प्रत्येक गटांतील दोन असे एकूण आठ संघ उपान्त्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतात. त्या फेरीतील निकालांवर हे संघ उपान्त्य आणि अंतिम फेरीत प्रवेश करतात. मात्र रणजी संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी या स्पर्धेत उप-उपान्त्यपूर्व फेरीचा समावेश करण्याची मागणी केली आहे. या फेरीच्या समावेशाने स्पर्धेच्या बाद फेरीतील संघांमध्ये दुपटीने, तसेच सामन्यांमध्ये आठ सामन्यांनी वाढ होणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघाला एक अतिरिक्‍त सामना खेळावा लागणार आहे. सध्या उपान्त्यपूर्व फेरीसाठी चार गटांमधून प्रत्येकी दोन संघ पात्र ठरतात. मात्र उप-उपान्त्यपूर्व फेरी सुरू झाल्यास या फेरीत एकूण सोळा संघ समाविष्ट होतील. त्यामुळे स्पर्धेतील चुरस आणखीन वाढेल असे मत तांत्रिक समितीतील एका सदस्याने व्यक्‍त केले. देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम दरवर्षी रणजी करंडक स्पर्धेने सुरू होतो, मात्र या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटचा हंगाम विजय हजारे ट्रॉफीने सुरू होणार असून रणजी करंडक स्पर्धा ऑक्‍टोबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.

-Ads-

तांत्रिक समितीचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, देशांतर्गत स्पर्धांच्या वेळापत्रकात सुसंगतपणा आणून स्पर्धांमध्ये सुसूत्रता आणावी लागेल. रणजी करंडक स्पर्धेत भारतीय बनावटीच्या एस.जी. कसोटी चेंडूऐवजी लाल कुकाबुरा चेंडू वापरण्याच्या सूचनेबद्दल बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी एस.जी. चेंडूचाच वापर करण्याचा आदेश दिला. तसेच यंदाच्या दुलीप करंडक स्पर्धेतही गुलाबी चेंडूंचा वापर केला जाणार असून त्याद्वारे दिवस-रात्र सामने खेळविणे शक्‍य होईल. तसेच नवनव्या ठिकाणी सामने घेण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे यावेळी स्वागत करण्यात आले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)