रडीचा डाव खेळू नका- शरद पवार

आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवू 


नाव न घेता कॉंग्रेसवर “हल्लाबोल’

पुणे- सामान्य माणसांना विद्यमान सरकारचे डोक्‍यावरचे ओझे जड झाले आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षांचा पराभव करण्याची भूमिका मित्रपक्ष आणि आम्ही मांडतो. त्यामुळे एक विचाराची ही भूमिका मित्रपक्षाने याकडे गांभिर्याने पाहिले, तर आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ, पण रडीचा डाव खेळू नका, या शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाव न घेता कॉंग्रेसवरच “हल्लाबोल’ केला.

समंजसपणाने मार्ग काढण्याची आमची तयारी असली, तरी आम्ही जिंकलेली जागा आम्हीच लढवू. दुसरा पर्याय नाही, असे सुनावत अगामी विधानपरिषद आणि लोकसभा तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकांबाबत पक्षाची भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय महासचिव डी. पी. त्रिपाठी, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे, मधुकर पिचड, अरुण गुजराथी, अण्णासाहेब डांगे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक आमदार-खासदार, राज्यातले पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पवार म्हणाले, मित्रपक्षाशी बोलून समन्वय साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. लातूर-उस्मानाबाद आणि बीड या जागा आपल्याकडे नाहीत. पण, त्यासाठी आपण आग्रही राहू. कारण, या जागा आपल्या होत्या.

यासंदर्भात वर्तमानपत्रातून माझ्या वाचनात आले. मित्रपक्षांच्यावतीने सांगण्यात आले, की तुमचा अधिकार काय, तुम्ही मागता काय? यावर कॉंग्रेसला उद्देशून पवारांनी सुनावले की “ज्यांचा व्यवहार ठीक असेल, त्यांनी हे बोलावे’. या वेळी पवार यांनी कॉंग्रेसने विधान परिषद आणि विधानसभेच्या जागांबाबत कॉंग्रेससोबत आघाडी असतानाही ज्या ठिकाणी कॉंग्रेसने मैत्रीधर्म निभावला नाही, त्याचा लेखाजोखाच सादर केला. त्यात साताऱ्याची जागा कोणाची होती? विधानपरिषदेची ती जागा कोणी आमच्याकडून हिसकावून घेतली? यवतमाळ, सोलापूरच्या जागा राष्ट्रवादीच्या असताना जातीयवाद्यांशी जवळीक साधणाऱ्यांना कोणी मदत केली, याचे उत्तर द्यावे लागेल. असे सांगत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.

कॉंग्रेसने समंजसपणाने मार्ग काढावा
आम्ही जिंकलेल्या जागा यापुढे आम्हीच लढविणार, असे पवार यांनी राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि राज्यसभेच्या पोटनिवडणुकांच्या तोंडावर स्पष्ट केले. आताही काही पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. आमचा प्रयत्न समन्वयचा आहे. एखादी लोकसभा त्यांनी (कॉंग्रेस) लढवावी. एखादी आम्ही लढवू. रास्त कारण असल्याशिवाय आम्ही भूमिका घेणार नाही, असे ते म्हणाले. उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला, ही साधीसुधी गोष्ट नाही. हे लक्षात घेता कॉंग्रेसने समंजसपणाने मार्ग काढावा,असे ते म्हणाले.

सांगलीच्या जागेवरून ठिणगी
समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचे संकेत देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने कॉंग्रेसशी मैत्रीचा हात पुढे केला असला, तरी या दोन्ही पक्षांमध्ये पलूसच्या विधानसभेच्या जागेवरून वाद वाढण्याची चिन्हे आहेत. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पलूस विधानसभेची पोटनिवडणूक आता जाहीर झाली आहे. आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली, तर त्यांना दोष देता येणार नाही.

पवारांचे हे वक्तव्य पोटनिवडणूक लढवण्यास इच्छूक पतंगरावाचे पुत्र डॉ. विश्वजित यांना अडचणीत आणणारे आहे. त्यामागे दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. त्यावेळी सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत कॉंग्रेसच्या मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीचा पराभव केला होता. तब्बल 127 मतांची आघाडी असूनही पतंगराव कदम आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या डावपेचांमुळे हा पराभव झाल्याचे राष्ट्रवादीचे मत आहे. त्याचा वचपा काढण्यासाठी आता राष्ट्रवादीकडून ही जागा लढविली जाण्याची शक्‍यता आहे.

पंतप्रधान आता गप्प का ?
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जास्त बोलत नव्हते. त्यामुळे प्रत्येक तासाला सोशल मीडियावरून बोलणारे पंतप्रधान देशाने निवडून दिले. मात्र, हे पंतप्रधान रोहित वेमूला आत्महत्याप्रकरण, कठुआ आणि उनवा बलात्कारप्रकरण, अल्पसंख्यांकावर होणारे हल्ले याबाबत काहीच बोलत नाहीत, अशी टीका पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)