रडीचा डाव (अग्रलेख)

क्रिकेटला कोणीतरी “जंटलमन्स गेम’ असे नाव दिले आहे. मात्र, अलीकडील काळात या सभ्य माणसांच्या खेळात असभ्य प्रकार अधिक प्रमाणात घडू लागले आहेत. कधी मैदानावर शिवीगाळ, तर कधी ड्रेसिंग रुममधील भांडण; कधी वर्णद्वेषी टिप्पणी तर कधी पार्ट्यांमधील धिंगाणा! कधी मॅचफिक्‍सिंग, तर कधी मंडळांमधील गैरकारभार! मैदानावर प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवायचाच, या हेतूने खेळाडूंनी उतरणे आणि त्यानुसार आपल्या क्रीडाकौशल्याचे सादरीकरण करणे, यात गैर काहीच नाही.

एखाद्या संघाला सामना जिंकण्याच्या दबावाखाली सतत वावरावे लागते, हे खरे आहे. मात्र, सामना जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणे हे खेळ भावनेच्या विरोधात आहे. विशेषत: जगातील महान खेळाडूंनी क्रिकेटची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण खेळालाच प्रतिष्ठा राहिली नाही तर खेळाडूंना सन्मान कोण देईल? यानिमित्ताने कथित जगज्जेत्या संघाचा रडीचा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.

मात्र, या खेळासाठीच्या नियमांची पायमल्ली करून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो निश्‍चितच आक्षेपार्ह आहे. त्यातही जगज्जेत्या राहिलेल्या आणि व्यावसायिक खेळाबाबत अग्रक्रमाने नामोल्लेख होणाऱ्या संघाकडून अथवा त्यातील खेळाडूकडून अशी लबाडी केली जात असेल, तर त्याबाबत टीका होणे स्वाभाविकच नव्हे; तर आवश्‍यकही आहे. हे सर्व विवेचन अर्थातच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाबाबत आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊनमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी रडीचा डाव खेळला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला लगाम घालण्यासाठी आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन करत. कॅमेरुन बॅंक्रॉफ्ट या गोलंदाजाने चेंडू कुरतडण्याचा प्रकार केला. त्याच्या या कृत्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट हादरून गेले आहे.

घडलेल्या प्रकारामुळे क्रिकेटला मॅच फिक्‍सिंगच्या रुपाने लागलेला कलंक हा “बॉल टेंपरिंग’च्या रूपाने आणखीच गडद झाला आहे. तसे पाहता, क्रिकेटमध्ये काळा इतिहास लिहिण्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू माहीर आहेत; आणि हे वारंवार सिद्ध झाले आहे. सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे, अश्‍लिल हावभाव करणे, विचित्र खाणाखुणा करणे यासारख्या गोष्टी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकरता नेहमीच्या राहिल्या आहेत. यावरून मैदानात अनेकदा बाचाबाची झाल्याचेही प्रकार घडले आहेत. कोणत्याही संघाविरुद्ध मालिका सुरू करण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया “माइंड गेम’चा आधार घेतो, हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्यात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडू तर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर माध्यमाद्वारे हल्ला करून त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात.

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाचे बहुतांशी महान खेळाडू याप्रकारच्या कृत्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी राहिलेले आहेत. सन 2008 मध्ये भारताचा फिरकीपटू हरभजनसिंग आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू सायमंडस यांच्यातील “मंकीगेट’ वाद सर्वश्रुत आहे. सध्या चर्चेत आलेला ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ स्वत: नियमांची पायमल्ली करत आला आहे. सन 2017 च्या मार्च महिन्यात बंगळूर कसोटीत स्टीव्ह स्मिथला फील्ड अंपायरने बाद दिले होते. मात्र, त्याने डीआरएस रेफरल घेण्यासाठी ड्रेसिंग रुमकडे मदतीसाठी इशारा केला. मात्र, नियमानुसार “डीआरएस रेफरल’मध्ये मैदानावर असलेल्या खेळाडूलाच निर्णय घ्यावा लागतो आणि ड्रेसिंग रुमला अशा प्रकरणात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जात नाही.

तरीही स्मिथने ड्रेसिंग रुमची मदत घेण्याचे धारिष्ट्य दाखवले होते. मॅचफिक्‍सिंगचे सावट काही प्रमाणात कमी होत असतानाच “बॉल टॅम्परिंग’चे पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापन समितीच्या लीडरशिप ग्रुपने बॅंक्रॉफ्टला जबाबदार धरल्याचे स्टिव्ह स्मिथने मान्य केले. स्मिथ हा आयसीसीच्या क्रिकेट आचारसंहिताच्या कलम 2.2.1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळून आला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने स्मिथला कर्णधारपदावरून तर डेव्हिड वॉर्नरला उपकर्णधारपदावरून काढले. ऑस्ट्रेलियासारख्या प्रतिष्ठित संघातील खेळाडूंनी सामना जिंकण्यासाठी चेंडू कुरतडण्याचा आधार घेणे हे खेळभावनेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे आहे. खेळाडू अशा प्रकारचे वर्तन का करतात? क्रिकेटच नव्हे तर प्रत्येक खेळामध्ये संघ आणि संघातील प्रत्येक खेळाडू हा कोणत्याही स्थितीत पराभव मान्य करण्यास तयार नसतात.

क्रिकेटमधील अर्थकारण लक्षात घेता विजयासाठीची भावना अधिक तीव्र बनत चालली आहे. त्यातूनच चेंडू कुरतडण्यासारखे प्रकार घडतात. अनेकदा खेळाडूंच्या चुकीकडे कानाडोळा केला जातो किंवा त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. तेव्हा त्या खेळाडूला अशा प्रकारचे कृत्य करण्याचे अधिक बळ येते. स्मिथबाबतही हेच घडले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान गेल्यावर्षी बंगळूर कसोटीत स्मिथने हॅंडसकोंबबरोबर खेळताना केलेल्या चुकीकडे दुर्लक्ष केले नसते, तर आज अशा प्रकारची छेडछाड करण्याची हिंमत झाली नसती.

साधारणत: 18 वर्षांपूर्वी सन 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाकिस्तानचा गोलंदाज वकार युनुसने बॉल कुरतडल्याचा प्रकार पहिल्यांदा केला होता. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय पातळीवर एका सामन्यासाठी निलंबित होणारा वकार हा पहिला गोलंदाज ठरला होता. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला देखील मैदानात चेंडू कुरतडताना अनेकदा पाहिले आहे. एखाद्या संघाला सामना जिंकण्याच्या सतत दबावाखाली वावरावे लागते, हे खरे आहे. मात्र, सामना जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाणे हे खेळ भावनेच्या विरोधात आहे. विशेषत: जगातील महान खेळाडूंनी क्रिकेटची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण खेळालाच प्रतिष्ठा राहिली नाही तर खेळाडूंना सन्मान कोण देईल? यानिमित्ताने कथित जगज्जेत्या संघाचा रडीचा डाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)