रजोनिवृत्ती आणि हृदयविकार

– डॉ. पवनकुमार शर्मा

रजोनिवृत्ती हा महिलांच्या आरोग्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून याकडे आपण दुर्लक्ष केले तर अनेक जीवघेणे आजार वाढण्याची शक्‍यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. स्त्रीच्या आयुष्यात वयाच्या 13 ते 15 व्या वर्षी मासिक पाळीला सुरुवात होते व साधारण चांद्रमासाच्या अवधीनं दर महिन्याला चालू राहते. वयाच्या 40 ते 45 वर्षांपर्यंत मासिक पाळी चालू राहते व त्या काळात गरोदरपण आल्यास त्यात तात्पुरता खंड पडतो.

वयाची 40 वर्षे झाल्यावर बीजग्रंथीचं कार्य संपुष्टात येतं व त्यानंतर बीज उत्सर्जन बंद पडल्यामुळे व बीज ग्रंथीमध्ये आंतररस (होर्मोन्स) तयार होण्याचं थांबल्यामुळे मासिक पाळी येणं शक्‍य नसतं. पाळी हळूहळू कमी प्रमाणात येऊ लागते किंवा चांद्रमासापेक्षा उशिरा येऊ लागते व काही काळानंतर ती कायमची बंद होते. या काळाला रजोनिवृत्ती काळ म्हणतात.
परंतु आता बदलत्या काळानुसार रजोनिवृत्तीनंतरचा काळ हा महिलांसाठी कठीण होत चालला आहे. रजोनिवृत्तीचा काळ हा महिलांच्या आयुष्यातला एक कठीण काळ समजला जातो.

शरीरात झालेल्या बदलांमुळे मानसिक ताण, हृदयात धडधड होणे, घाम येणे, अंग गरम होणे, अतिसार, वारंवार मूत्रप्रवृत्ती, तोंडाला कोरड पडणे, झोप कमी होणे, हातापायाला कंप सुटणे अशी लक्षणे आढळून येतात; परंतु रजोनिवृत्तीविषयी समाजामध्ये जागरूकता नसल्यामुळे अनेक महिला या आजारांकडे दुर्लक्ष करतात व पुढे हृदयविकारासारख्या गंभीर आजाराला बळी पडतात.

रजोनिवृत्तीचा काळ स्त्रीच्या आयुष्यातील परिवर्तनाचा काळ असतो. त्यामुळे डॉक्‍टरांना भेटून वारंवार होत असलेल्या आजारांवर योग्य ते उपाय केल्यास गंभीर आजारांपासून महिला दूर राहतील असा विश्‍वास ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मंगला पाटील यांनी जागतिक रजोनिवृत्ती दिनानिमित्त व्यक्त केला. रजोनिवृत्ती व हृदयविकार यांचा संबंध सांगताना बांद्रा येथील लीलावती हॉस्पिटलमधील ज्येष्ठ हृदय शल्यविशारद डॉ. पवन कुमार सांगतात, रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसणाऱ्या मानसिक समस्या म्हणजे चिंतारोग (एन्झायटी) आणि नैराश्‍य होय व यामुळे त्या उच्च रक्तदाबाला बळी पडत आहेत.

विशेषत: शहरी भागात ऑफिसला जाणाऱ्या महिलांमध्ये धूम्रपान, मद्यपान, वाढलेले वजन आणि कौटुंबिक इतिहास, वाईट जनुके आदी घटक लक्षात घेतले तर त्यांचा रक्तदाब अधिक असतो व त्यामुळे त्यांना तर मधुमेहाचा धोकाही वाढलेला असतो व अशामध्ये रजोनिवृत्तीच्या वेळी योग्य काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा आजार जडू शकतो.

रजोनिवृत्ती झाल्यानंतर इस्ट्रोजेन नावाचे हार्मोन कमी झाल्यामुळे वैद्यकीयदृष्ट्या इतर महिलांपेक्षा रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमध्ये 23 टक्के हृदयविकाराचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते व हे प्रमाण शहरातील महिलांमध्ये 34 टक्के आढळून येत आहे. उच्च रक्तदाब, नैराश्‍य व रजोनिवृत्ती अशा विचित्र त्रिकोणात आजची महिला अडकली असून मासिक पाळी व आजार याविषयी समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे.

वेळेआधी रजोनिवृत्ती
वेळेआधी रजोनिवृत्ती प्राप्त होणाऱ्या महिलांमध्ये भावनिक अस्थैर्य, हळवेपणा वाढतो; काहींना उगाच रडावेसे वाटते; काहींना उगाच राग येतो व त्यांच्यात चिडचिडेपणा वाढतो, असे स्त्रीरोग व मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णांच्या पाहणीत दिसून आले आहे. अशा महिलांना कुठल्या तरी छंदात गुरफटून ठेवणे हे महत्त्वाचे असून, यात कुटुंबाचा आपलेपणाही महत्त्वाचा ठरणार आहे.

वेळेआधी रजोनिवृत्ती प्राप्त होणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांमध्ये हृदयविकाराचा, तसेच मेंदूमध्ये रक्तस्राव, रक्तदाब वाढणे, हाडे ठिसूळ होणे, विस्मरण, एकाग्रता कमी होणे, केस गळणे, त्वचा शुष्क होणे, स्तनांचा आकार कमी होणे, पोटावर चरबी गोळा होणे, बद्धकोष्ठता, डोके दुखणे, गरगरणे, सांधे दुखणे, कमी ऐकू येणे, दृष्टिदोष यांसारखे त्रास काहींना जाणवत असल्याचे आढळून आले आहे.

साधारण 30 टक्के स्त्रियांना रजोनिवृत्तीचा फारसा त्रास होत नाही. काहींना तीव्र स्वरूपाचा, तर काहींना ही अवस्था प्राप्त होण्याआधीच काही वर्षांपासून त्रास सुरू होतो. रजोनिवृत्तीपूर्वीच दोन ते तीन वर्षे आधी त्रास सुरू होतो; तर काही स्त्रियांमध्ये दहा वर्षे आधीपासूनच कमी-अधिक प्रमाणात पाळीची अनियमितता हे प्राथमिक लक्षण दिसून येते. त्यांची पाळी एकतर दोन ते तीन आठवड्यांत किंवा 40 दिवस ते काही महिने उशिरा येत असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)