रघुराम राजन विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार ?

मुंबई: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एका कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे. या आमंत्रणाची जोरदार चर्चा असतानाच आता विश्व हिंदू परिषदेने रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर यांना वर्ल्ड हिंदू काँग्रेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे. यंदा शिकागोत वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी राजन यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

चार वर्षातून एकदा आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत, तिबेटी धर्मगुरु दलाई लामा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गियर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जगभरातील हिंदूंना सन्मान मिळावा, त्यांची प्रतिष्ठा वाढावी, या उद्देशानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1893 रोजी ऐतिहासिक भाषण केले होते. या भाषणाला 125 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे आयोजन करण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर असलेल्या रघुराम राजन यांनी वर्ल्ड हिंदू काँग्रेसमध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार मांडावेत, असे आयोजकांना वाटते. त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमातील राजन यांचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे. कार्यक्रमात सहभागी होणार की नाही, याबद्दल राजन यांनी आयोजकांना कोणतीही माहिती दिलेली नाही. राजन आमंत्रण स्विकारतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)