रखरखीत उन्हात प्रवाशांचे हाल

राजगुरूनगर- राजगुरूनगर शहरात पुणे-नाशिक महामार्गावर आज दिवसभर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे, नागरिकांचे रखरखीत उन्हात मोठे हाल झाले. राजगुरूनगर शहरामध्ये आज शुक्रवारी बाजार भरतो. त्यासाठी मोठ्या संख्येने राजगुरूनगर येथे परिसरातील नागरिक येत असतात. याबरोबरच लग्न सराई असल्याने आज महामार्गावरील लग्न कार्यालये असल्याने वाहनांची मोठी गर्दी होती तर राजगुरूनगर शहरामध्ये पुणे नाशिक महामार्गालगत नगर परिषदेने दुरुस्तीचे काम सुरू केल्याने वाहतूक कोंडीत भर पडली.

आज बाजाराचा दिबस असल्याने राजगुरूनगर शहरात आणि पुणे नाशिक महामार्गावर कोंडी झाल्याने भर उन्हात प्रवाश्‍यांना अडकून बसावे लागले. सर्वाधिक त्रास रुग्णवाहिकेतून जाणाऱ्या रुग्णांना सहन करावा लागला. नेहमीप्रमाणे राजगुरूनगर येथे वाहतूक कोंडी झाली आज सकाळी दहा वाजता वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली, ती रात्री आठ वाजेपर्यंत कायम होती. पोलीस यंत्रणा, होमगार्ड ठिकठिकाणी तैनात केले होते. मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यात त्यांना अपयश आले. त्यातच आज नगरपरिषदेने रस्त्यालगत ड्रेनेजचे काम करताना जेसीबी लावल्याने वाहतूक कोंडीत अजूनच भर पडली. राजगुरूनगर येथे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

पुणे नाशिक महामार्गावर शासकीय विश्रामगृह ते चांडोली फाटापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे प्रवाश्‍यांना मोठा त्रास झाला. राजगुरूनगर येथे आज झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी आणि नागरिकांचे भर उन्हात मोठे हाल झाले. बाह्यवळण रस्ता होत नसल्याने आणि केदारेश्वर येथील पुलाचे अपूर्ण काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांची ही समस्या सुटत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)