रखरखत्या विस्तवावरून चालत हजारोंची नवसपूर्ती

हनुमान टाकळी (ता. पाथर्डी) : येथील श्री क्षेत्र हनुमान टाकळीतील रहाड यात्रेदरम्यान नवसपूर्तीसाठी विस्तवारून चालताना महिला भाविक.

हनुमान टाकळीतील रहाड यात्रा उत्साहात : आदिनाथ शास्त्री महाराज, प्रशांत भालेराव यांची उपस्थिती

तिसगाव – तालुक्‍यातील हनुमान टाकळी येथील सुमारे चारशे वर्षांची परंपरा असलेल्या रहाड यात्रेला राज्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. समर्थ रामदास स्वामींनी स्वतःच्या हाताने गायीच्या शेनापासून हनुमंताची मूर्ती करून या ठिकाणी स्थापन केल्याने या देवस्थानला विशेष महत्त्व आहे. जागृत देवस्थान म्हणून देशभर हनुमान टाकळी देवस्थानची ख्याती आहे. हनुमानाचा जयघोष करत रखरखत्या विस्तवावरून अनवाणी पायाने चालत माता, भगिनी, अबालवृद्ध भाविकांनी नवसपूर्ती केली. हा एक चमत्कारच यात्रेच्या दिवशी पाहावयास मिळतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात प्रसिध्य असलेली राहाड यात्रा गेल्या अनेक वर्षापासून श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे आषाढ वद्य चतुर्दशीला भरवली जाते. यावर्षी सायंकाळी 4 वाजता तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते हनुमान मूर्तीचे प्रथम पूजन करण्यात आले. त्यानंतर रहाडाची विधीवत पूजा करून अग्नीप्रज्ज्वलीत करण्यात आला. यावेळी रेणुका माता पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भालेराव, देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश महाराज भट, तहसीलदार गणेश मरकड आदी प्रमुख मान्यवर हजर होते.

मंदिरासमोर खोदलेल्या बारा फूट लांब दोन फूट खोल तर अडीच फूट रुंदीच्या चरात बोरींच्या लाकडाचा विस्तव तयार करण्यात आला होता. रखरखत्या विस्तवातून समर्थ हनुमानाचा जयघोष करत भाविकांनी चालत जावून आपली नवसपूर्ती केली. अबालवृद्ध महिला, पुरुष, लहान मुले येथे चालत होते. रहाडातून प्रथम जाण्याचा मान आष्टी तालुक्‍यातील लोखंडे परिवाराला परंपरेप्रमाणे मिळाला. विस्तवावरून चालण्यासाठी मंदिरासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिसरातील मंदिराकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलवून गेले होते. सायंकाळी 5 नंतर रस्तावर वाहतुकीची कोंडी झाली होती. यात्रेत विविध खेळण्या व मिठाईची दुकाने भासिकांचे आर्कषण ठरले.

मुंबईचे पोलीस निरीक्षक सुभाष दैगडखैर व बबन दैगडखैर यांच्या वतीने भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. हनुमान देवस्थान समिती व ग्रामपंचायतीने येणाऱ्या भाविकांना सुखसोयी, सुविधा उपलब्ध करून दिल्या. गावातील तरूण मंडळाच्या कार्यकर्ते, ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. देवस्थान समितीचे अध्यक्ष रमेश भट महाराज यांनी भाविकांचे स्वागत केले.

आख्यायिका अशी…

संकटकाळी स्वतः हनुमंतराया धावून आल्याच्या अनेक आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांची समर्थ हनुमंतरायावर अपार श्रद्धा आहे. अनेक वर्षापूर्वी देवस्थानच्या शेजारीच असलेल्या कोपरे गावात कोपरे धरणाचे बांधकाम सरकारने सुरू केले होते. परिसरातील शेतकऱ्यांचा या धरणाला विरोध होता. सरकारी यंत्रणा व परिसरातील शेतकरी यांच्यात धरणाच्या बांधकामावरून संघर्ष झाला. शेतकऱ्यांनी धरण बांधकामाला विरोध केल्याने शेतकऱ्यांवर यावेळी गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले, अशा वेळी हजारो वानर अचानक येऊन शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिली. सरकारी यंत्रणा गडबडून गेली व हा प्रकल्प बंद राहिला. अखेर सरकारला माघार घ्यावी लागली. अशा अनेक चमत्काराच्या आख्यायिका बुजूर्ग नागरिकांकडून सांगितल्या जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)