रखडलेली कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

  • आनंदधाम स्मशानभूमीः पत्र्याच्या शेडची झाली चाळणी

पिंपरी – महापालिकेने लाखो रुपयांचा चुराडा करूनही आंनदधाम स्मशानभूमीतील कामे रखडलेली आहे. प्रस्तावीत लॉन्स, दहन शेडमधील खड्डे, दहन शेडमधील पत्र्यांची झालेली दुरवस्था यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. परंतु, महापालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. लाखो रूपयांचा करभरणा करूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. रखडलेली कामे प्रशासनाने त्वरीत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

मोरवाडी येथे दीड एकरच्या परिसरामध्ये असलेल्या आनंदधाम स्मशानभूमीला असुविधेच्या प्रश्‍नांनी ग्रासले आहे. दहन शेडच्या पत्र्याची चाळणी झाली आहे. काही ठिकाणी मोठाली छिद्र पडलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागते आहे. पावसाळा तोंडावर आल्यामुळे नागरिकांकडून शेड दुरूस्तीची मागणी होत आहे. त्याच बरोबर पाच दहन खड्डे येथे अपुरे पडत आहेत. त्यांची मांडणी देखील जवळ-जवळ असल्याने एकाच वेळी तीन-चार मयत आल्यावर अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे शेडच्या कामासोबत दहन खड्ड्याच्या जागी सहा लोखंडी दहन जाळ्यांची मागणी होत आहे. सध्या असलेल्या दहन खड्ड्याच्या विटा निघाल्या असून एक दहन खड्डा कोणत्याच उपयोगाचा नसल्याचेही दिसून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नाही. एकच पाण्याची टाकी आहे. तिला एकच नळ असल्याने मृताच्या नातेवाईकाला ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या टाकी सोबत दहा ते पंधरा नळाची सुविधा उफलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. परिसरात दिवाबत्ती चोविस तास सुरू राहत नाही. विजेचे खांब मोजकेच आहेत. त्यातही काहीच दिवे सुरू असल्याने रात्री अंत्यविधी करायची वेळ आली तर नातेवाईकाना अंधारातच विधी उरकावी लागत आहे. आजूबाजूचा परिसर स्वच्छ नसल्याने साप निघत असल्याची भीती वर्तवली जात आहे. वेळेवर साफसफाई होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढिग तसेच पडलेले आहेत. निवारा शेडमध्ये स्वच्छतेचा अभाव दिसून आला. स्वच्छतागृहामधील साहित्य लंपास केले आहे. अस्वच्छता असल्याने दुर्गंधीमुळे उभे राहणे कठीण झाले आहे.

प्रस्तावीत लॉन्सचे काम अर्ध झालेले आहे. थोड्याच दिवसांत ते काम पुर्ण करण्याचे आश्‍वासन देऊन गेलेले कर्मचारी अजूनपर्यत आलेच नाहीत. त्यामुळे ते काम तसेच रखडलेले आहे. त्याच्या भोवताल लावलेली झाडे पाण्याअभावी काटक झाली आहेत. प्रशासनाचे कुठल्याच बाबीकडे लक्ष नसल्याने स्मशानभूमीची ही अवस्था झाली असल्याचे नागरिकानी सांगितले.

सुरक्षा रक्षकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांना रहायला देलेली खोली मोडकळीस आली असून कधी पडणार ते सांगता येत नसल्याचे तिच्या दुरवस्थेवरून दिसून आले. त्यांना प्यायला पाणी देखील तिथे उपलब्ध नाही. की बसायला जागा नाही. त्यामुळे त्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीचे नाव असलेल्या फलकाचा रंग उडून गेला आहे, पत्रा देखील निखळला आहे. त्यामुळे नातेवाईकांना स्मशानभूमीचा शोध घेण्यात अडचणीचा सामना करावा लागत आहे. चौकाच्या कोपऱ्यात स्मशानभूमी असल्याने वाहनांची गर्दी असते. त्यामुळे शोधायची कशी असा प्रश्‍न नातेवाईकांना पडला आहे. त्यामुळे त्वरीत नवीन फलक बसविण्याची मागणी होत आहे.

नागरिकांची मागणी
पत्र्याचा शेड बदलविण्यात यावा
सहा लोखंडी दहन जाळ्या बसविण्यात
पाण्याची व्यवस्था करावी
सुरक्षा रक्षाकंना स्वतंत्र खोली मिळावी
दिवाबत्तीसोबत चोविस तास विज असावी
स्वच्छता वेळेवर करण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)