रक्‍तासाठी ‘सक्‍ती’चा डाग पुसणार!

-रक्‍तपुरवठ्यावेळी नातेवाईकांना रक्‍तदानाची अट टाकूच नका
– तक्रार आल्यास रक्‍तपेढ्या, रुग्णालये कचाट्यात
– राज्य रक्‍त संक्रमण परिषदेची रक्‍त ताकिद

पुणे – उपचार घेणाऱ्या रुग्णाला रक्‍तपुरवठा करताना त्या बदल्यात त्याच्या नातेवाईकांना दुसरे रक्‍त उपलब्ध करण्याची सक्‍ती आता रुग्णालये आणि रक्‍तपेढ्यांना करता येणार नाही. त्याबाबत रुग्णाने किंवा त्याच्या नातेवाईकाची तक्रार आल्यास संबंधित खासगी, सरकारी रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकिद राज्य रक्‍त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) दिली आहे. त्यामुळे नेहमी रक्‍तासाठी नातेवाईकांची होणार धावपळ थांबण्यास मदत होण्याची शक्‍यता आहे.

रुग्णालयांच्या पेढीत रक्‍ताचा तुटवडा भासू नये, यासाठी अनेकदा तेथील रक्‍तपेढ्यांकडून रक्‍ताच्या बदल्यात रुग्णाच्या नातेवाईकांना रक्‍त आणण्याची सक्‍ती केली जाते किंवा रक्‍तदाता उपलब्ध करण्याची सूचना केली जाते. या प्रकारामुळे रक्‍तदाता अथवा पर्यायी रक्‍त मिळविण्यासाठी नातेवाईकांची दमछाक होते. अशा वेळी नातेवाईकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. अशा स्वरुपाच्या तक्रारी छुप्या पद्धतीने राज्य आणि केंद्र शासनाकडे येत होत्या. त्या पार्श्‍वभूमीवर, राष्ट्रीय रक्‍त संक्रमण परिषदेने धोरण निश्‍चित केले. रक्‍तपेढ्यांची सक्‍ती राष्ट्रीय धोरणाच्या विरोधात आहे. याकडे राज्य रक्‍त संक्रमण परिषदेने लक्ष वेधून त्याबाबत पावले उचलली आहेत.

या संदर्भात केईएम हॉस्पिटलच्या रक्‍तपेढीचे प्रमुख डॉ. आनंद चाफेकर म्हणाले, “रक्‍ताच्या बदलत्या रक्‍ताची सक्‍ती करू नये असे, यापूर्वीच राष्ट्रीय रक्‍त संक्रमण परिषदेने त्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे. रुग्णाला रक्‍त पुरवण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयाची आहे. राष्ट्रीय संक्रमण परिषदेला रक्‍ताच्या बदल्यात रक्‍तदाता ही पद्धत कमी करायची आहे. त्याऐवजी ऐच्छिक रक्तदाता तयार उपलब्ध करायचे आहेत. रक्‍ताच्या बदल्यात रक्‍त म्हणून दुसरा कोणी तरी अज्ञात रक्‍तदाता आणण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, आता ही पद्धत बंद होत आहे.’

 

रक्‍तपेढीत रक्‍ताचा पुरेसा साठा करून ठेवण्याची जबाबदारी संबंधित रुग्णालयांची असते. त्यासाठी बदली रक्‍तदाता आणण्याची सक्‍ती करणे राष्ट्रीय रक्‍त धोरणाविरोधात आहे. रुग्णालयात रक्‍तपेढ्यांमध्ये रक्‍ताचा किती साठा उपलब्ध आहे, रक्‍त पिशवीची किंमत किती आहे, याची माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेशही दिले होते. त्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल.
– डॉ. अरुण थोरात, संचालक, राज्य रक्‍त संक्रमण परिषद.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)