रक्षा विसर्जनाला आलेल्यांना आगेमोहाने फोडले

गावकऱ्यांसह पैपाहुणे मधमाशांच्या हल्ल्यात जखमी
पाचगणी, दि. 13 (प्रतिनिधी) – रक्षा विसर्जनाच्या विधीसाठी गेलेल्या गावकऱ्यांसह पैपाहुण्यांनी आगेमोहाच्या माशांनी चांगलेच फोडून काढले आहे. या घटनेत सुमारे चाळीस ते पन्नासजण जखमी झाले असून यातील एका व्यक्तीला मोठ्या प्रमाणात माशा चावल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे. हा सर्व प्रकार जावली तालुक्‍यातील रामवाडी येथे बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडला.
रामवाडी, ता. जावळी येथील समशान भूमीत आज सकाळी रक्षा विसर्जन (सावडणे) विधी करण्याकरिता गेलेल्या गावकरी व पै पाहुणे असे एकूण चाळीस ते पन्नास लोकांवर आगेमोहाच्या मधमाशानी अचानक हल्ला केल्याने सर्वांची धावपळ उडाली. रक्षा विसर्जन न करताच सर्व जणांची पळापळ सुरु झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले. यामध्ये ज्ञानेश्वर तुकाराम पाडळे या प्राथमिक शिक्षकास माशांनी खूपच चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. यातील अनेक जखमींनी आपापल्या परीने रामवाडी, करहर, येथील खाजगी दवाखान्यात तर काहींनी सोमर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले आहेत. झालेल्या प्रकारमुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
जखमी झालेल्यामध्ये लक्ष्मण कोंडीबा पाडळे, विजय बळवंत पोफळे, ज्ञानेश्वर तुकाराम पाडळे, नारायण हरी गलगले, बळवंत बाबुराव पाडळे, बाजीराव धोंडिबा सणस, महादेव सदाशिव सणस, बबन रामचंद्र गलगले, निलेश खाडे सर्व रामवाडीमधील आहेत. तर जखमी झालेल्या पाहुणे लोकांची नावे समजू शकली नाहीत.
रामवाडी, ता. जावळी येथील प्रकाश मारुती बोधे यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा अंत्यविधी सोमवारी झाला होता. बुधवारी त्यांचा रक्षा विसर्जनाचा विधी होता. त्याकरिता सर्वजण समशान भूमीत गेले होते. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम चालू होण्यागोदारच आगे मोहाच्या माशांनी हल्ला केल्याने विसर्जनाचा विधीच अधर्वट टाकून लोकांना पळ काढावा लागला आहे. या लोकांचा पाठलाग माशांनी गावापर्यंत केला. यामध्ये अनेक महिलांनाही माशांनी चावा घेतला आहे. यानंतर घरातील व्यक्तींनी दुपारी स्मशान भूमीत जाऊन रक्षा विसर्जनाचे साहित्य घेऊन स्मशान भूमीपासून थोड्या अंतरावर सोपस्कार पूर्ण केले. झालेल्या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पुन्हा या बाजूला फिरकण्याचे धाडस कोणीही गावकऱ्यांनी केले नाही. पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून ग्रामस्थांमधून या आगेमोहाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

याआधीसुद्धा दोन वर्षांपूर्वी अंत्यविधीच्या वेळी असाच प्रकार घडला होता. त्यावेळी सुद्धा आगेमोहाने अनेक लोकांना जखमी केले होते. तसाच प्रकार आज पुन्हा घडला आहे. त्यामुळे गावकरी या ठिकाणी जाण्यास भीत आहेत. तरी या ठिकाणी एक ते दोन मोठी आगे मोहाची पोळी आहेत. या दिवसात शेतात जाळला जाणारा पालापाचोळा व वणवा यामुळे होणाऱ्या धुरामुळे या माशा चिडतात. त्यामुळे असे प्रकार घडत असतात.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)