‘रंग नवा, संकल्प हवा’

सागर ननावरे 

नव्या वर्षाच्या स्वागता,नवे सूर नवी गाणी
नव्या हर्षाच्या सोबती,जुन्या स्मरू आठवणी
पाहता पाहता आज या वर्षाचा अखेरचा दिवसही आला. नेहमीप्रमाणे सर्वांच्या ओठांवर शब्द तरळू लागले की “हे वर्ष कसे भराभर सरले कळलेही नाही”. जुन्या वर्षाने दिलेल्या आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात तशाच साठून राहिल्या आहेत. परंतु याचबरोबर प्रत्येकाच्या मनाला नव्या वर्षाच्या नव्या औत्सुक्‍याची ओढ लागली आहे.
छोडो कल की बाते, कल की बात पुरानी
नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी

असेच काहीसे प्रत्येकाच्या मनमंदिरी गुंजत आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काही तास बाकी राहिले आहेत. आजची रात्र अनेकांसाठी रंगबिरंगी,मद्यधुंद आणि पार्टीची असणार आहे. तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काही ध्येयवेडे नव्या संकल्पांच्या शुभारंभासाठी सज्ज झालेले आहेत. कारण आज आखलेले छोटे छोटे संकल्प उद्याच्या भव्यदिव्य यशाची नांदी ठरणार असतात. ठरवलेले संकल्प कधी तडीस जातात तर कधी मोडीस येतात. परंतु नव्या उमेदीने नव्या संकल्पांची आखणी करणे यात अधिक महत्वाचे. पुलं नी म्हटल्याप्रमाणे ,”कुणाचा गणपती दीड दिवसाचा,तर कुणाचा दहा दिवसांचा असतो, तीच गोष्ट संकल्पाची.”

संकल्प कृतीत नेण्यापेक्षा त्या संकल्पाची आखणी करण्यात मिळणारा आनंद जरा निराळाच असतो.
असो पुढच्या वर्षी म्हणजेच उद्याच्या दिवशी आपल्या जीवनाच्या समृद्धतेसाठी काही संकल्प नक्कीच करायला हवेत. सकाळी लवकर उठणे, डायरी लिहिणे, व्यसन सोडणे ,वजन कमी करणे, नियमित व्यायाम /योगा करणे असे दरवर्षी हमखास आखल्या जाणाऱ्या तात्पुरत्या संकल्पासोबतच यंदा जरा वेगळा विचार करूया. आपल्या व्यक्तिमत्वाला नवी झालर देणारे काही संकल्प आखूया.

आनंदी राहूया :
येत्या वर्षात आपण दुःख,राग,तणाव,चिडचिड आणि वादविवाद यांना सुट्टी देऊन नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया. कारण आपल्या चेहऱ्यावरील हास्य स्वतःला आणि इतरांना एक विलक्षण समाधान देऊन जाईल. हसतमुख आणि आनंदी चेहरा आपल्या व्यक्तिमत्वाला खुलविण्यासाठी महत्वाचा असतो.
स्वतःला वेळ देऊया :
आजच्या धावपळीच्या युगात जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागलेली असते. हे सर्व करताना आपण काम,कर्तव्ये,जबाबदाऱ्या यामध्ये इतके गुरफटून जातो की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळही मिळत नाही. नव्या वर्षात आपल्याला साऱ्या गोष्टी सांभाळून प्राधान्याने स्वतःसाठी आवर्जून वेळ द्यायचा आहे. घड्याळाच्या काट्यांमागे धावण्यापेक्षा ज्या गोष्टींतून आपल्याला नंद मिळतो अशा गोष्टी, छंद, आकांक्षा यासाठी वेळ देऊया.

सकारात्मक विचार करूया :
नव्या वर्षी नकारात्मक विचारांना बगल देऊन सकारात्मक विचारसरणी मनी बाळगण्याचा संकल्प करूया. प्रतिकूल परिस्थितीत भावनांच्या पुरात वाहत जाण्यापेक्षा सकारात्मक राहून नव्या वाटा निर्माण करण्याचा आत्मविश्वास आपल्यात यायला हवा. आपल्याला नव्या वर्षात जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करायलाच हवा.
ध्येय प्राप्तीचा ध्यास घेऊया :
ध्येयाविना जीवनाला काहीही अर्थ नाही. आणि म्हणूनच नव्या वर्षात नव्या यशासाठी नव्या जोमाने नवे ध्येय साकारण्यासाठी सज्ज असायला हवे. त्यासाठी योग्य नियोजन, उद्दिष्टांची आखणी, मेहनतीची तयारी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती इत्यादी गोष्टींबाबत विचार सुस्पष्ट असायला हवा.

देण्याची भावना ठेऊया :
जेव्हा आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळेल तेव्हा आपल्यातील दानशूरपणा सामाजिक कार्यासाठी नक्कीच उपयोगात आणावा. समाजातील दुर्बल,असहाय आणि निराधारांना आर्थिक व मानसिक आधार देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याइतके समाधान इतर कशातही नाही.
देण्याची भावना वाढली की येण्याचा मार्ग मोकळा होत असतो.
चला तर मग उद्याच्या नव्या वर्षाच्या नव्या संकल्पांना नव्या उत्साहाने हाती घेऊया.
नव्या वर्षाच्या स्वागता ,करू ध्येयाची खोचणी
नव्या उमेदीने करू, नव्या यशाची वेचणी.
तुम्हाला व तुमच्या कुटूंबीयांना नववर्ष सुखाचे,समृद्धिचे,आरोग्यमय जावो,नविन वर्षाच्या मनपुर्वक शुभेच्छा.
भेटूया पुढच्या वर्षी नव्या प्रेरणेसह….


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)