योद्धा संन्यासी राष्ट्रपुरूष

अनेकांच्या दृष्टीला भारतीय विचार, भारतीय प्रथा, भारतीय आचार व्यवहार, भारतीय तत्वज्ञान, भारतीय साहित्य प्रथमदर्शनी चमत्कारिक वाटते. परंतु, तेथेच न थबकता ते जर नेटाने अध्ययन करतील, मन लावून चिकाटीने भारतीय ग्रंथांचे अनुशीलन करतील, भारतीय आचार-व्यवहारांच्या मुळाशी असलेल्या महान तत्वांची नीट ओळख करून घेतील तर त्यांच्यापैकी शेकडा नव्याण्णव जण भारतीय विचारांच्या सौंदर्याने, भारतीय भावांनी मुग्ध होऊन गेल्याचे तुम्हाला आढळून येईल. असे म्हणत भारतीय तत्वज्ञान संपूर्ण जगाला ज्ञात करीत आयुष्य जगणारे योद्धा संन्यासी राष्ट्रपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचा नरेंद्रनाथ दत्त ते स्वामी विवेकानंद हा झालेला प्रवास अत्यंत विलक्षण असा आहे. तो सर्वांना प्रेरणा देणारा आहे. त्यांना त्यांच्या आयुष्यात असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांचे निधन झाल्यांनतर तत्कालीन स्थितीमध्ये कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळे त्यांना काही काळ नोकरीही करावी लागली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वामी विवेकानंद यांनी समर्थ विचारांचा वारसा आपल्याला दिला आहे. ज्यावर चालत आज असंख्य तरुण आपल्या आयुष्यामध्ये सन्मार्गावरून मार्गक्रमण करीत आहेत. विवेकानंद यांच्या जन्मदिनी दरवर्षी 12 जानेवारीला भारत सरकारतर्फे 1985 पासून राष्ट्रीय युवा दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो. या माध्यमातून त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार केला जातो. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक धर्मपरिषदेला संबोधित करीत असताना Sisters and Brothers of America या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून जगाला मंत्रमुग्ध करणारे स्वामीजी एक आदर्श तत्वज्ञ होते. या भाषणातून त्यांनी असंख्य धर्म जरी असले तरी सगळ्यांचे मार्ग एकाच ईश्‍वरापर्यंत जातात, असे सांगितले. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका त्यांनी कधीही सोडली नाही. आपले गुरू रामकृष्ण परमहंस यांचीही त्यांनी अनेकवेळा परीक्षा घेऊनच त्यांना आपले गुरू म्हणून स्वीकारले.

देशाच्या उत्थानासाठी तरुणांना कार्यप्रवण करणारे स्वामीजींचे विचार आहेत. त्यांच्या विचारांना न समजता केवळ ते भगवी वस्त्र धारण करतात, ते हिंदू आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना स्वामी विवेकानंद यांची राष्ट्रभक्‍ती, विवेकवादी, मानवतावादी, समन्वयवादी आणि वास्तवदर्शी अध्यात्मिक भूमिका कधी समजलीच नाही. आपल्या देशातील समस्यांचे आपल्याला समाधान करायचे असेल तर त्यासाठी एकच तोडगा आहे तो म्हणजे शिक्षण असे विवेकानंद म्हणत असत. शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा अविष्कार होय अशी ते शिक्षणाची व्याख्या करतात. संपूर्ण भारतभ्रमण करीत असताना त्यांचे चिंतन, मनन, संशोधन सातत्यपूर्ण चालू होते. ईश्‍वरप्राप्ती म्हणजे प्रत्येक जीवात्म्याचे दु:ख दूर करण्यासाठी त्याला मदत करणे होय. असे ते नेहमी सांगत.

Anything that makes you weak physically, intellectually and spiritually reject as a poison असे म्हणत स्वामी विवेकानंद हे आज संपूर्ण तरूणवर्गाला प्रेरकशक्ती म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांचे विचार तरूणांना भावतात तसेच तरूण त्याचे आचरणही करतात.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन. तसेच सर्वांना राष्ट्रीय युवादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

श्रीकांत येरूळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)