योग्य नियोजनामुळे वाघोली वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी

वाघोली- गेल्या चार वर्षांपासून निर्माण झालेला वाहतूक कोंडीचा जटील प्रश्न लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी उत्कृष्ट नियोजन करून मार्गी लावल्याबद्दल पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
पुणे-नगर महामार्गावर गेल्या चार-पाच वर्षांपासून वाघोली येथे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले होते. अनेकवेळ विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था, पत्रकार, स्थानिक नागरिक यांच्या माध्यमातून बैठकांद्वारे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न झाले; परंतु त्याला यश मिळाले नाही. तत्कालीन पोलीस अधिकारी चंद्रकांत जाधव, सर्जेराव पाटील यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सातत्याने विविध प्रयोग केले होते. या रस्त्यावरील अतिक्रमणे, वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत खांब, अरुंद रस्ते, रस्त्याची दुरावस्था आदी अनेक समस्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी कितीही योजना राबवल्या तरी कोंडी सोडवण्याचे प्रयत्न निष्फळ जात होते. विद्युत कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन असे विविध विभाग दोषी असताना फक्त पोलिसांनाच नागरिकांच्या आरोपाचा सामना करावा लागत होता.
दोन महिन्यापूर्वी रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी गंभीर गुन्ह्यांबरोबरच येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकडे लक्ष केंद्रित केले. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायत, नागरिक, स्वंयसेवी संस्था, स्थानिक नेते, कार्यकर्ते, अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन केले. सर्वांच्या सहकाऱ्यातून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी योग्य नियोजन केले. ग्रामपंचायत, पोलीस मित्र, वार्डन, नागरीक या सर्वांच्या कृतीशील सहकाऱ्यातून उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे नगर महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीदेखील या कामासाठी मानकर यांना पोलीस कर्मचारी वाढवून दिले. याचीच दखल घेत नागरिकांनी मानकर यांचा सन्मान पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते केला.

  • वाघोली येथील वाहतूक समस्या मार्गी लावण्यात पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी सुहास गरूड, पोलीस मित्र, वॉर्डन, पोलीस कर्मचारी, ग्रामपंचायत, नागरिक यांच्या कृतीशील मदतीमुळे मी या सन्मानास पात्र ठरू शकलो.
    – प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, लोणीकंद

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)